क्व्हार : एड्रिॲटिक समुद्रातील यूगोस्लोव्हियाचे बेट. क्षेत्रफळ २९० चौ. किमी. लोकसंख्या १२,१३२ (१९६१). क्रोएशिया विभागातील डाल्मेशिया किनाऱ्याजवळच्या या खडकाळ बेटावर संगमरवर सापडतो. भूमध्य सामुद्रिक हवामानामुळे प्रवाशांचे हे आवडीचे ठिकाण असून द्राक्षे, ऑलिव्ह, अंजीर, खजूर इ. फळे शेवंती व इतर वासाची फुले येथे होतात. सुवासिक तेले, मद्य, मध, बोटी बांधणे, मच्छीमारी हे येथील उद्योग होत. नवाश्मयुगीन अवशेष बेटावर सापडले असून इ. स. पू. चौथ्या शतकात ही ग्रीकांची वसाहत होती. सध्याच्या क्व्हार शहराजवळ प्राचीन ग्रीक फॅरस शहर होते. इ.स.पू. तिसऱ्या शतकात हे बेट रोमनांकडे आले. अनेक सत्तांतरांनंतर हे यूगोस्लाव्हियाकडे आले. तथापि स्लाव्ह संस्कृतीचे हे प्रथमपासून केंद्र आहे. बाराव्या  शतकातील बायझंटीन  शैलीतील कॅथीड्रल, पंधराव्या शतकातील फ्रॅन्सिस्कन चर्च व सोळाव्या शतकातील व्हिनीशियन किल्ला या येथील प्रेक्षणीय वास्तू होत.

ओक, द. ह.