बिनेनॲल्स्टर सरोवरानजीकच्या नगरभवनाचे दृश्यहँबर्ग : जर्मनीतील एक शहर, महत्त्वाचे बंदर आणि व्यापारकेंद्र. यूरोप खंडातील औद्योगिक दृष्ट्या व्यस्त असलेले हे एक मोठे बंदर असून निम्न एल्ब नदीखोऱ्याच्या उत्तरेस एल्ब नदीच्या उपनद्या बिली आणि ॲल्स्टर यांच्या संगमावर वसलेले आहे. लोकसंख्या १७,४६,३४२ (२०१३). क्लॉडियस टॉलेमी (टॉलेमस) याच्या Geographike Hyphegesis(भूगोलशास्त्राचा मार्गदर्शक) या पुस्तकातील निर्देशानुसार या शहराचे प्रारंभीचे नाव ट्रेवा असे होते. इ. स. ८०८ मध्ये सम्राट शार्लमेनने स्लाव्ह आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी ॲल्स्टर व एल्ब नदीच्या मध्यभागी दगडी भागावर किल्ला बांधला व त्यास हँबर्ग हे नाव दिले. या किल्ल्यावरूनच या शहरास हँबर्ग हे नाव मिळाले. ८३४ मध्ये येथे बिशपचे मुख्यालय स्थापन करण्यात आले होते. ८४५ मध्ये व्हायकिंग टोळ्यांनी या शहराची लूट करून जाळपोळ केली होती. पोलंड आणि डेन्मार्क येथील राजांच्या आक्रमणासही या शहरास तोंड द्यावे लागले (१०३०–१२१४). जर्मनीचा पहिला फ्रेड्रिक बार्बारोसा याने ११८९ मध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध करून शहरास सार्वभौम व स्वायत्त शहराचा दर्जा दिला. तसेच निम्न एल्ब ते बाल्टिक समुद्र यांदरम्यान व्यापारी मार्ग खुला केला. त्यामुळे अल्पावधीतच या शहराचा बंदर म्हणून विकास झाला. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस शहराभोवती अर्ध्या भागात तटबंदी उभारण्यात आली. तीस वर्षांचे युद्धकाळातही शहराने आपले निरवलंबित्व कायम राखून डेन्मार्क, स्वीडन, हॉलंड यांच्याशी यशस्वी वाटाघाटी करून शहराचा विकास केला. पहिला नेपोलियन याने शहराचा ताबा घेऊन हे छोटे राज्य फ्रेंच साम्राज्यात पूर्णतः विलीन केले परंतु नेपोलियनच्या पाडावानंतर हे शहर फ्रेंचांपासून मुक्त झाले (१८१४). १८१५ मधील व्हिएन्ना परिषदेच्या ठरावानुसार हँबर्ग राज्याला जर्मन संघराज्याचे एकोणचाळिसावे राज्य म्हणून मान्यता देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब वर्षावाचा या शहरास जबरदस्त फटका बसला, निम्मेअधिक शहर जमीनदोस्त झाले आणि उपनगर परिसरातील सु. एक लाख लोक मृत्युमुखी पडले. युद्धानंतर प्रशासनाने हे शहर पुन्हा उभारले.

 

शहरात व परिसरात अनेक कालवे व प्रवाह असून त्यांना ओलांडण्या-साठी त्यांवर सु. २,३०० पूल बांधण्यात आले आहेत. जर्मनीत जाण्यासाठी सर्व जगाकरिता हे शहर प्रवेशद्वार आहे. १०० पेक्षा अधिक देशांतील १५,००० पेक्षा जास्त मालवाहू जहाजांची वार्षिक ये-जा या बंदरातूनसुरू असते. येथे युव्हर्सी झेन्ट्रम ही मोठी वखार आहे. अनेक शतकां-पासून हे शहर यूरोपातील अर्थपुरवठ्याचे प्रमुख केंद्र आहे. औद्योगिक साधनसामग्री, विमानसेवा, पोलाद, तांबे व ॲल्युमिनियम निर्मिती, जहाजबांधणी सामग्री इ. उद्योग येथे केंद्रित झाले आहेत. १९९० मध्ये झालेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणामुळे हँबर्ग शहराचा व्यापार मध्य-पूर्व यूरोपियन राष्ट्रांशी वाढलेला आहे. फूहल्सबटेल आणि फिंकेनवेर्डर हे दोन विमानतळ येथे आहेत. शहराचे हवामान सागरी समशीतोष्ण स्वरूपाचे असल्यामुळे स्वास्थ्यवर्धक व आल्हाददायक आहे. त्यामुळेच शहराच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसाय महत्त्वाचा आहे. येथे हँबर्ग विद्यापीठ (१९१९) व हँबर्ग तंत्रज्ञान विद्यापीठ ही दोन विद्यापीठे असून सेंट मिखाइल चर्च, हँबर्ग स्टेट ऑपेरा, नॉर्थ जर्मनी रेडिओ सिम्फनी ऑर्केस्ट्रा, द लायन किंग म्यूझिकल थिएटर, इंटरनॅशनल मॅरिटाइम म्यूझीयम हीयेथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

येळणे, नारायणराव