लॉपनॉर : चीनच्या वायव्य भागातील सिक्यांग-ऊईगुर या खायत्त विभागातील क्षार न दलदलयुक्त प्राचीन सरोवर. हे रोमन भाषेत लो-पू- पो, तर मंगोलियन भाषेत लॉप नूर (सरोवर) म्हणून ओळखले जाते. सुमारे ४० अंश उ. अक्षांश व ९० अंश पू. रेखाशांदरम्यान विस्तारलेले हे सरोवर चीनच्या निर्जन व खडतर हवामानाच्या प्रदेशात असून सांप्रत बहुतांश कोरडे पडले आहे. तारीम खोऱ्याच्या पूर्व भागात असलेल्या या सरोवराला तारीम नदीद्वारे थोडाफार पाणीपुरवठा होत असे. परंतु या नदीने वाहून आणलेले क्षार व गाळ यांचे संचयन होऊन सरोवर उथळ व क्षारयुक्त बनले आहे. सांप्रत याच्या तळभागावर क्षारांचा थर साचलेला दिसून येतो. तसेच जोरदार वाऱ्याबरोबर वाहून येणाऱ्या वाळूच्या व मातीच्या ढिगाऱ्यांमुळे सरोवरचा आकार व स्थान सतत बदलत आहे, काही तज्ञांच्या मते सरोवरात साचणाऱ्या गाळामुळे त्याचे लहानसहान दलादलींचे भाग बनून तारीम नदीतून काळात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्या दलदलींचे सरोवरांची तात्पुरते रूपांतर होत असे, त्यामुळे संपूर्ण लॉपनॉर ही सरोवरांची मालिता (रांग) असल्यासारखे दिसे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी व बेभरवरशाचे सरोवराचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमीजास्त होते.

दोन हजार वर्षांपूर्वी हे ४१° उ. अक्षांश व ९०° पू. रेखांशांवर असल्याचे व मार्को पोलोलाही हे सरोवर तेथेच आढळल्याचा उल्लेख मिळतो. त्यानंतरच्या काही संशोधकांना ते ३०° उ. व ८८° पू. रेखांशांदरम्यान आढळले. १८७६-७७ मध्ये रशियन संशोधक न्यिकलाई पर्झिव्हॅल्‍स्काई यांनी व १८९९-१९०२, १९२८ मध्ये स्वीडीश संशोधक स्व्हेन हेडीन यांनी या प्रदेशाचा अभ्यास केला. हेडीन यांना हे सरोवर ४०° ३०’ उ. व ९० अंश पू. यांदरम्यान आढळले व त्यावेळी ते सु.१५५ किमी लांब व ४० ते ६० किमी.रुंद होते. १९५० मध्ये लॉपनॉरने २,००० किमी. क्षेत्र व्यापले होते. परंतु १९६० मध्ये तारीम नदीवर पाणीपुवठ्याच्या योजना पूर्ण झाल्याने तिच्या मधल्या टप्पात पाणी अडविल्याने सरोवराचा विस्तार होणे बंद झाले आहे. १९८० व ८१ मध्ये चिनी शास्त्रज्ञांच्या पथकाने कार्बन-१४ पद्धतीने या भागाचे संशोधन केले असून त्यानुसार गेली २०,००० वर्षे या सरोवराच्या क्षेत्रामध्ये बदल होण्याची क्रिया सातत्याने चालू होती, असे निष्कर्ष निघाले आहेत. याशिवाय लॉपनॉरच्या क्षेत्राचे वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षरण होत असून या प्रदेशात क्षाराचा थर वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे. या थराने सु. २०,७१९ चौ. किमी. क्षारांनी बनलेल्या अनियमित आकाराच्या यारदांगने सु. ३,१०८ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे.

हा प्रदेश अत्यंत विषम हवामानाचा, अवर्षणग्रस्त व वनस्पतिविरहित आहे. प्‍लेगच्या साथीमुळे बरेच ऊईगुर लोक मृत्यूमुखी पडल्याने व बाकीच्यांनी येथून पळ काढल्याने १९२० पासून तो निर्जन झाला आहे. १९६४ पासून चीनने या भागात अणुस्फोट-चाचण्या घेण्यास सुरूवात केली आहे. 

डिसूझा, आ. रे. चौंडे, मा. ल.