लिट्‍ल रॉक : अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनातील आर्‍कॅन्सॉ राज्याची राजधानी, राज्यातील सर्वांत मोठे शहर आणि पुलॅस्की परगण्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १,५८,४६१ (१९८०). हे आर्‍कॅन्सॉ नदीच्या दक्षिण तीरावर, राज्याच्या साधारण मध्यावर आणि वॉशिटॉ पर्वतपायथ्याच्या टेकड्यांमध्ये वसले आहे. हे महत्त्वाचे नदीबंदर असून हवाईमार्ग, लोहमार्ग आणि महामार्ग यांचे राज्यांतर्गत दळणवळणाचे मध्यवर्ती ठिकाण तसेच औद्योगिक, व्यापारी व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. 

आर्‍कॅन्सॉ नदीचे समन्वेषण करीत असताना बेर्नार दे ला हार्प या फ्रेंच समन्वेषकाला नदीच्या किनाऱ्यावर खडकांचे दोन लहानमोठे सुळके आढळले (इ.स.१७२२). त्या खडकांना त्याने ‘ला पेटिट रॉश’ (लिट्‍ल रॉक) व ‘ला ग्रांदे रॉश’ (बिग रॉक) अशी नावे दिली. छोट्या खडकाजवळ क्वापॉ इंडियन लोकांची वसती होती. हे ठिकाण त्याने व्यापारी केंद्रासाठी निश्चित केले आणि फ्रेंच सरकाराला त्याचा विकास करण्याची सूचना दिली. तेथून वरच्या बाजूस ३ किमी अंतरावरील ‘बिग रॉक’ येथे प्रथम लष्करी ठाणे उघडण्यात आले. आणि नंतर तेथे पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. १८१२ मध्ये विल्यम ल्यूइस या फाइस या फासेपारध्याने लिट्‍ल रॉक येथे प्रथम आपले घर बांधले. १८१९ मध्ये आर्‍कॅन्सॉ राज्यक्षेत्राची स्थापना करण्यात आली. १८२१ मध्ये लिट्‍ल रॉकचे सर्वेक्षण करून तीच राज्यक्षेत्रीय राजधानी करण्यात आली. १८३१ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला. १८३६ मध्ये आर्‍कॅन्सॉ राज्यक्षेत्राला राज्याचा दर्जा मिळाला आणि लिट्‍ल रॉक हे राजधानीचे ठिकाण बनले. यादवी युद्धकाळात (१८६३) येथे लढाई झाली ती ‘लिट्‍ल रॉकची लढाई’ या नावाने प्रसिद्ध आहे. लोहमार्गांच्या विकासामुळे १८८० पासून हे बंदर महत्त्वाचे दळणवळण केंद्र म्हणून विकसित झाले. आर्‍कॅन्सॉ नदीवरील धरणे व जलपाशसुविधा यांमुळे १९६९ पासून नदीबंदर म्हणून याचे महत्त्व वाढले आहे.

नऊ कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना १९५७ मध्ये येथील सेंट्रल हायस्कूलमध्ये वर्णविग्रहाच्या मुद्यावरून प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेने साऱ्या जगाचे लक्ष लिट्‍ल रॉककडे वेधले गेले. राष्ट्रीय संसदेने वर्णविग्रह घटनाबाह्य ठरविला आणि या नऊ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा आदेश दिला. तरी राज्याने काळ्या-गोऱ्यांच्या सहशिक्षणाविरुद्ध केंद्र सरकारशी निकराचा लढा दिला आणि शिक्षण खाजगी संस्थांकडे सोपवून काळ्या-गोऱ्यांच्या वेगवेगळ्या शाळांना हट्ट कायम ठेवला. या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्रीय लष्करी दल लिट्‍ल रॉकमध्ये पाठविण्यात आले होते. पुढील काही वर्षांत ही विषमता हळूहळू नष्ट झाली. 

लिट्‍ल रॉकच्या पूर्वेकडील प्रदेश कृषियोग्य आहे. कापूस, तांदूळ, सोयाबीन ही येथील मुख्य पिके असून आसमंतातील कृषिउत्पादनांची ही प्रमुख बाजारपेठ आहे. पश्चिमेकडील प्रदेशात पशुपालन, कुक्‍कुटपालन आणि फलोत्पादन महत्त्वाचे आहे. बॉक्साइटच्या खाणींसाठी लिट्‍ल रॉकचा आसमंत प्रसिद्ध आहे. त्याशिवाय अँटिमनी, बॅराइट, शिसे, जस्त, मँगॅनीज, पारा ही धातूखनिजे अस्फाल्ट, मृद्‍खनिज, रेती, जिप्सम, चुनखडक, संगमरवर, वाळू, अभ्रक हा अधातू खनिजे आणि कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही ऊर्जासाधने यांचे उत्पादन याच्या परिसरातून होते. शहराच्या नैर्ऋत्येस ४४९ हे. मध्ये वसलेल्या औद्योगिक क्षेत्रात सर्व उद्योगधंदे एकवटलेले आहेत. धातूजुळणी, कागद, लाकूड चिरकाम, विद्युत् सामग्री, प्लॅस्टिक नळ, खाद्यपदार्थ, कापड, तयार कपडे, रसायने, लाकडी सामान, सरकी उत्पादने, ॲल्युमिनियम, काँक्रीट व उत्पादने, पूर्वरचित घरे व घरवाहक गाड्या, बांधकामाचे साहित्य, कीटकनाशके, घड्याळे इ. निर्मितिउद्योगधंदे शहरात चालतात. शहरात छपाई उद्योग व प्रकाशनसंस्थाही आहेत.

लिट्‍ल रॉक हे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. जुने लिट्ल रॉक विद्यापीठ व आर्‍कॅन्सॉ विद्यापीठ यांचे एकत्रीकरण करून स्थापलेले आर्‍कॅन्सॉ विद्यापीठ (स्थापना १९६९), फिलँडर स्मिथ (१८६८) , आर्‍कॅन्सॉ बॅप्टिस्ट (१८८४) , शॉर्टर ही महाविद्यालये, तसेच औषध-विज्ञान, दंतविज्ञान, वैद्यक, शुश्रूषा, विधी, तंत्रज्ञान व सामाजिक कार्यविषयक विद्याशाखा येथे आहेत. अंध व बहिऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथे शिक्षणाची सोय आहे. १८३६ पूर्वीचे, १८३६ ते १९११ पर्यंतचे व सांप्रतचे अशी तीन विधानभवने येथे आहेत. सांप्रतचे विधानभवन १९१६ मध्ये बांधून पूर्ण झाले असून त्याची वास्तू म्हणजे वाशिंग्टन डी.सी. मधील राजभवनाची प्रतिकृती आहे. सेनाप्रमुख जनरल डग्‍लस मॅक्‍आर्थर यांचे जन्मस्थान असलेल्या भव्य मॅक्‍आर्थर उद्यानात आर्‍कॅन्सॉ कलाकेंद्र आणि विज्ञान व निसर्गेतिहासविषयक वस्तुसंग्रहालये आहेत. आर्‍कॅन्सॉ ऑर्केस्ट्रा सोसायटी, चेंबर म्यूझिक सोसायटी, कम्यूनिटी थिएटर, कोरल सोसायटी, कम्यूनिटी कॉन्सर्ट असोसिएशन अशा इतर सांस्कृतिक संस्थाही येथे आहेत. शहरात वीस उद्याने व मनोरंजन केंद्रे असून एक विस्तीर्ण प्राणीसंग्रहालय आहे. जवळच असलेल्या जॅक्सनव्हिल येथे लिट्‍ल रॉकचा विमानतळ आहे. लिट्‍ल रॉकमधील तीन वार्षिक समारंभ महत्त्वाचे असतात. त्यावेळी प्रायोगिक कला, दृक् कला यांची स्पर्धात्मक प्रदर्शने, आर्‍कॅन्सॉ राज्याचे पशुधन प्रदर्शन व जत्रा आणि अश्वप्रदर्शने आयोजित करण्यात येतात. 

पंडित, भाग्यश्री चौधरी, वसंत