वुर्ट्सबर्ग : वुर्ट्सबर्ग. जर्मनीच्या बव्हेरिया प्रांतातील, लोअर फ्रँकोनिया जिल्ह्यामधील एक शहर, रेल्वे प्रस्थानक, नदीबंदर आणि प्रसिद्ध द्राक्षसंवर्धन केंद्र. लोकसंख्या १,२८,००० (१९८६ अंदाज). हे न्यूरेंबर्गच्या वायव्येस ८० किमी. मेन नदीच्या दोन्ही  तीरांवर वसले आहे.

केल्टिक लोकांचे वसाहतीचे ठिकाण तसेच रोमनांचे वसतिस्थान म्हणून ख्यातनाम असलेल्या या शहराचा इ. स. ७०४ मध्ये ‘वर्टबर्च’ असा उल्लेख सापडतो. सेंट बॉनफस या ख्रिस्ती संताने ७४२ मध्ये येथे एक बिशप-कार्यालय स्थापिले. तेव्हापासून या शहराचे नियंत्रण अतिशय सामर्थ्यशाली अशा फ्रँकोनियाच्या राजपुत्र-बिशपांकडे सु. हजार वर्षांपर्यंत होते. या कालावधीत या शहराचे अस्तित्व पाद्री वा धर्मोपदेशक यांच्या पूर्ण प्रभावाखाली होते. बिशपांच्या सत्तेविरुद्ध येथील नागरिकांनी अनेक वेळा उठाव करूनही अखेरीस १४०० मध्ये नागरिकांनाच बिशपांविरुद्ध शरणागती पतकरावी लागली. अनेक शाही विधिमंडळसभा व परिषदा यांचे वर्ट्सबर्ग हे केंद्र होते. १९८० मध्ये हेन्री द लायन याला राजाज्ञेवरून स्थानबद्ध करण्यात येऊन त्याच्याकडून बव्हेरियाचे ड्यूकपद काढून घेण्यात आले व ते व्हिटेल्सबाख वंशातील ऑटो नावाच्या व्यक्तीकडे सोपविण्यात आले. जुलिअस बिशपच्या अंमलाखाली (१५७३-१६१७) वर्ट्सबर्गची प्रगती होत गेली. अठराव्या शतकात शोनबॉर्न वंशातील बिशपांच्या निरनिराळ्या सत्ताकाळांत वर्ट्सबर्गमध्ये उत्तमोत्तम वास्तू बांधण्यात आल्या. १८०२ मध्ये बिशपची धोरणे ऐहिकवादी बनली. पुढल्याच वर्षी हे शहर बव्हेरियाच्या ताब्यात गेले. १८०५ मध्ये ऱ्हाईन महासंघातील वर्ट्सबर्गच्या मोठ्या ड्यूकसत्तेचे हे शहर प्रमुख केंद्र गणले जाऊ लागले. १८१५ मध्ये ते पुन्हा बव्हेरियाच्या ताब्यात गेले. दोन वर्षांनी येथे एक नवीन बिशप-कार्यालय उघडण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धात बरेचसे शहर नष्ट झाले. महायुद्धोत्तर काळात मात्र शहराची संपूर्ण पुनर्रचना करण्यात आली. योहान बाल्टासार नॉइमान (१६८७-१७५३) या जर्मन वास्तुशिल्पीने बरोक शैलीत बांधलेले आर्चबिशपचे भव्य निवासस्थान नष्ट झाले, तथापि त्यातील उत्कृष्ट जिना आणि त्या जिन्यावर जोव्हान्नी बातीस्ता त्वेपलो (१६९६-१७७०) या इटालियन चित्रकाराने काढलेली प्रख्यात भित्तिचित्रे ही मात्र विनाशातून वाचली. मध्ययुगीन मुख्य पूल, जुलिअस रुग्णालय (१५७६-८५), नगरभवन आणि मारीअनबेर्क किल्ला ही शहरातील ठळक वैशिष्ट्ये होत. या किल्ल्यामधील गोलाकार चर्च (७०६) जर्मनीतील सर्वात जुने असून अद्यापिही ते टिकून आहे. हे शहर पूर्वीच्या धार्मिक प्रांताचे मुख्यालय असल्याची साक्ष येथील रोमनेस्क कॅथीड्रल (१०३४ मध्ये बांधकामास प्रारंभ, ११८९ मध्ये अभिषिक्त, दुसऱ्या महायुद्धानंतर पुनरुज्जीवन) देते. इतर मध्ययुगीन लक्षणीय चर्चवास्तूंमध्ये मारीअनकापेल, नॉईम्यून्स्टर, सेंट बर्चर्ड इत्यादींचा अंतर्भाव होतो, तर बरोक आणि रोकोको वास्तुशैलींमध्ये बांधलेल्या चर्चवास्तूंपैकी हाउगर स्टिफ्टस्किर्च व कापेल (यात्रेकरूंसाठी नॉइमान याने बांधलेले चर्च) ह्या चर्चवास्तू अतिशय दर्शनीय मानण्यात येतात. शहरात १४०३ मध्ये बांधण्यात आलेले एक विद्यापीठ अल्पायुषी ठरले. सांप्रतचे वर्ट्सबर्ग विद्यापीठ हे बिशप जुलिअसने १५८२ मध्ये स्थापन केले. व्हिल्हेल्म कोनराट राँटगेन (१८४५-१९२३) हे विख्यात जर्मन भौतिकीविज्ञ या विद्यापीठात प्रथम कुंट यांचे साहाय्यक म्हणून (१८६९-७४) व नंतर प्राध्यापक म्हणून (१८८८-१९००) काम करीत होते. याच विद्यापीठात असताना राँटगेन यांनी क्ष-किरणांचा शोध लावला (१८९५).

वर्ट्सबर्ग हे फ्रँकोनियन मद्यनिर्मिती व वितरणकेंद्र म्हणून सुविख्यात असून ते पोलाद व मोटारगाड्या, कागद व छपाई, इलेक्ट्रॉनिकीय वस्तू, यंत्रसामग्री, रोटरी यंत्रे (चक्रगतिक दाब यंत्रे), लॅकर, कोकराचे चामडे, रसायने, लाकडी फर्निचर इत्यादींच्या निर्मितिउद्योगांचे एक महत्त्वाचे केंद्र गणले जाते. येथे दरवर्षी  ‘मोट्सार्ट’ हा संगीत महोत्सव साजरा होतो.

दळवी, र. कों.