काउं द्योगू : (पंधरावे शतक). पोर्तुगीज समन्वेषक. राजपुत्र हेन्ऱी नॅव्हिगेटर याच्या पदरी उमराव व नंतर सरदार म्हणून असताना पोर्तुगीज बादशाहने त्याला प्रथम १४८२ व नंतर १४८४–८६ अशा दोन वेळेस आफ्रिका खंडाच्या किनारपट्टीचे समन्वेषण करण्यास पाठविले. पहिल्या खेपेस त्याने मादागास्करमधील केप सेंट ऑगस्टीनचा शोध लावला. दुसऱ्या वेळेस त्याने काँगो नदीच्या मुखाचा शोध लावला. त्याने शोधलेल्या भूमीवर पोर्तुगीजांचा मालकी हक्क प्रस्थापित केला. झाडावर किंवा लाकडी क्रॉसवर हेन्ऱी द नॅव्हिगेटरचे ध्येयवाक्य लिहून मालकी प्रस्थापित करण्याच्या प्रथेत खुणा नामशेष होण्याची भीती असल्याने त्याने पेद्रो नावाची नवीन पद्धत आरंभिली. या पद्धतीत हातभर दगड रोवून त्यावर एका बाजूस पोर्तुगीज व दुसऱ्या बाजूस लॅटिन भाषेत पोर्तुगीज राजाचे नाव राजमुद्रा, समन्वेषकाचे नाव, तारीख इ. माहिती तो खोदून ठेवीत असे. असे पेद्रो अद्यापही आफ्रिकेत सापडतात. काँगो प्रदेशाला त्याने पेद्रो हे नाव दिले हाते. पहिल्या वेळेस त्याच्याबरोबर मार्टिन बिहेम नावाचा नकाशा काढणारा तज्ञ होता. काउंच्या कामगिरीबद्दल त्याचा मोठा सत्कार झाला होता. या प्रवासानंतरच्या त्याच्या आयुष्यक्रमाची काहीच माहिती उपलब्ध नाही.

शाह, र. रू.