पॉझनान : पोलंडमधील एक इतिहासप्रसिद्ध शहर व पॉझनान प्रांताची राजधानी. लोकसंख्या ५,२७,००० (१९७६). हे वॉर्ता नदीवर वॉर्सॉच्या पश्चिमेस सु. २८२ किमी. अंतरावर वसले आहे. हे रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्ग यांचे केंद्र आहे. नवव्या शतकात त्याची स्थापना झाली. काही काळ ते पोलंडची एक राजधानीही होते. खुल्या व्यापाराच्या धोरणामुळे हे यूरोपातील एक प्रमुख व्यापारी केंद्र बनले. पंधराव्या व सोळाव्या शतकांत ते सांस्कृतिक दृष्ट्या उत्कर्षाच्या शिखरावर होते तथापि सतराव्या शतकात युद्धांची सतत झळ लागून त्याचा ऱ्हास होत गेला. १७३९ मध्ये हे प्रशियाच्या ताब्यात गेले. १८०७ ते १८१५ यांदरम्यान त्यावर रशियाचे प्रशासन होते. पुढे ते परत प्रशियनांच्या ताब्यात गेले. १९१८ मध्ये ते पोलंडच्या अंमलाखाली आले. दुसऱ्या महायुद्धात या शहराची फार मोठी हानी झाली. महायुद्धोत्तर काळात त्याचे वेगाने पुनरुज्जीवन करण्यात आले. १९५६ मध्ये हे शहर स्वतंत्र प्रशासकीय भाग बनले. त्याच वर्षाच्या जून महिन्यात येथील औद्योगिक कामगारांनी बंडाचा उठाव केला. परिणामतः पोलिश कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात बदल होऊन गोमुल्का याच्या हाती पक्षाचे नेतृत्व आले. औद्योगिक दृष्ट्या अत्यंत प्रगत असलेल्या या शहरात लोहखनिजाचे शद्धीकरण, कृषिअवजारे, रसायने, औषधे, कापड, विद्युतसाहित्य, रबरप्रक्रिया, यंत्रसामग्री इ. उद्योग विकसित झाले आहेत. येथे लॅब्रॅन्स्की ॲकॅडमी ऑफ लिटरेचर (१५१८), ॲडम मिस्किएविस्क विद्यापीठ इ. उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत. येथील इ.स. ९६८ मध्ये बांधलेले कॅथीड्रल, गॉथिक शैलीतील सेंट मेरी चर्च (१४३४), निओक्लॅसिक राचिन्यस्की लायब्ररी (१८२९), द गोल्डन चॅपेल (१८३७) इ. उल्लेखनीय आहेत.

लिमये, दि.ह