लायडन : नेदर्लंड्समधील याच नावाच्या प्रांताचे मुख्यालय. लोकसंख्या १,०६,८०८ महानगर १,८१,०९५ (१ जानेवारी १९८७). लायडन हे देशाच्या पश्चिम भागात, द हेगच्या ईशान्येस १६ किमी., तर ॲम्स्टरडॅमच्या नैऱ्ऋत्येस ४८ किमी.वर ओल्ड ऱ्हाईन व न्यू ऱ्हाईन या नद्यांच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ‘लगड्यूनम बॅटव्होरम’ या नावाने ओळखले जाणारे हे शहर मूलतः रोमन नाही असे म्हटले जाते. स्पॅनिश आक्रमकांविरुद्ध लायडनचे संरक्षण करणारा येथील राजकारणपटू जेनस डूसा याने आपल्या न्यू पोएम्स या पुस्तकात हे नाव दिले असल्याचे आढळते. इ. स. ९२२ च्या सुमारास उत्रेक्तच्या बिशपच्या कार्यक्षेत्राखालील प्रदेश म्हणून ते ओळखले जात होते. त्यानंतर येथील बाराव्या शतकातील किल्ल्यासभोवार शहराचा विस्तार वाढत गेला. तसेच शहराची सनद निश्चित करण्यात येऊन १२६६ मध्ये वाढविण्यात आली.  १४२० पर्यंत हॉलंडच्या न्यायालयाच्या एका प्रतिनिधीकरवी त्यावर अधिसत्ता चालविली जाई. चौदाव्या शतकात ईप्रमधून आलेल्या विणकर समुदायाने हे शहर कापड विणकामाचे व वस्त्रनिर्मितीचे मोठे केंद्र बनविले. १५८१ च्या सुमारास लूर्व्हे येथून आलेल्या एल्झव्हर कुटुंबाने येथे आपला पहिला छापखाना स्थापिला. त्यायोगे लायडन हे छपाई उद्योगाचे एक लक्षणीय केंद्र बनले. डचांनी केलेल्या स्पेनविरोधी उठावात (मे-ऑक्टोबर १५७४) शहराला स्पॅनिश सैन्याने वेढा घातला होता त्यावेळी धरणाचे बंधारे फोडल्याने डच ग्रामीण भागातील लोकांनी नावांमधून बरीचशी दैनंदिन जीवनावश्यक सामग्री लायडनवासियांना पुरविली होती. या वेढ्याच्या समयी लायडनच्या नागरिकांनी दाखविलेल्या अतुलनीय धाडसामुळे तसेच त्यांनी दाखविलेल्या निकराच्या व शर्थीच्या प्रतिकारामुळे प्रभावित होऊन डच मुत्सद्दी व राजकारणपटू पहिला विल्यम द सायलेंट (१५३३-८४) याने लायडन शहरात एका विद्यापीठाची १५७५ मध्ये स्थापना केली. लायडन विद्यापीठ सतराव्या व अठराव्या शतकांत डच धर्मसुधारणा आंदोलन व ईश्वरविद्या तसेच विज्ञान व वैद्यक या शास्त्रांचे फार मोठे प्रगत केंद्र म्हणून ख्यातकीर्त झाले [⟶ लायडन विद्यापीठ]. 

 अठराव्या शतकात कापडउद्योगात आलेल्या मंदीचे सावट आर्थिक ऱ्हासावर काही काळ पडले असले, तरी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लायडनमध्ये औद्योगिकीकरण जलद होत गेले. सांप्रत शहरात कापड, ब्लँकेटे, यंत्रसामग्री, धातुकर्म, आरेख्यक कला, बांधकाम सामग्री, बॉयलर, शल्यक्रिया उपकरणे, कृत्रिम रबर, साबण, अत्तरे व सुगंधी द्रव्ये, दारूकाम साहित्य, डबाबंद अन्न यांचे निर्मितिउद्योग आहेत. लायडनमधील चीज व गुरे यांचे बाजार सबंध देशात मोठे समजले जातात. शहराच्या पश्चिम भागात कंदाची (बल्ब) शेते आहेत.

 लायडन हे पुढील प्रसिद्ध डच चित्रकारांचे जन्मग्राम म्हणून सुविख्यात आहे. श्रेष्ठ चित्रकार रेम्ब्रँट (१६०६-६९) यान व्हान गोईय (१५९६-१६५६)-निसर्गदृश्यांकरिता प्रसिद्ध यान स्टेन (१६२६-७९) यान ऑफ लायडन (१५०९-३६) हा डच धार्मिक नेता येथलाच. गाब्रिएल मेत्स्यू (१६२९-६७)-दैनंदिन जीवनातील चित्रे काढण्यात प्रसिद्धी मिळविलेला चित्रकार गेरार्ट डाऊ (१६१३-७५)- रेम्ब्रँटच्या हाताखाली चित्रकलेचे शिक्षण संपादिले-रेम्ब्रँटच्या निवृत्तीनंतर (१६३१) लायडन कला विभागाच्या प्रमुखपदी त्याची नियुक्ती करण्यात आली. दैनंदिन जीवनातील घटनांचे चित्रण करण्यात त्याची विशेष हातोटी होती.लायडनमधील विविध वनस्पतिउद्यानांमधून अनेक प्रकारच्या उष्णकटिबंधीय वनस्पतींचे लक्षणीय संग्रह जतन केल्याचे आढळते. शहरात इतिहास, मानवशास्त्र, पुरातत्त्वविद्या, भूविज्ञान, खनिजविज्ञान इत्यादींची महत्त्वपूर्ण संग्रहालये आहेत. निसर्गविज्ञाने आणि वैद्यकशास्त्र यांचे ‘बूरहॅव्ह संग्रहालय’ हे सबंध यूरोपमधील अशा प्रकारच्या संग्रहालयांमध्ये अग्रेसर म्हणून गणले जाते. येथे जुन्या शास्त्रीय उपकरणांचा मोठा संग्रह करण्यात आला आहे. आंतॉन व्हान लेव्हेनहूक (१६३२-१७२३) या डच निसर्गवैज्ञानिकाजवळच्या सूक्ष्मदर्शकांचा तसेच गाब्रिएल डानिएल फॅरेनहाइट (१६८६-१७३६) या जर्मन भौतिकीविज्ञाजवळील तापमापकांचा मोठा संग्रह या संग्रहालयात जतन करण्यात आलेला आहे.

 शहरातील जुन्या प्रेक्षणीय वास्तूंमध्ये ‘सिटी टिंबर हाउस’ (१६१२), न्यायमंदिर (तेरावे शतक), सेंट पीटर्स चर्च (१३३९), गॉथिक शैलीतील सेंट पँक्रस चर्च (चौदावे शतक) इत्यादींचा अंतर्भाव होतो. प्रबोधनकालीन नगरभवन (१३९२) ही वास्तू १९२९ मध्ये आगीच्या भक्षस्थानी पडली होती, तथापि ती पुन्हा बांधण्यात आली. पिलग्रिम फादर्स ह्यांचे सु. ११ वर्षे लायडन येथे वास्तव्य होते.

 लायडन हे रॉटरडॅम-ॲम्स्टरडॅम लोहमार्गावरील महत्त्वाचे शहर असून ते लोहमार्गांनी इतर शहरांना जोडलेले आहे. शहराजवळच कागेर लेक्स हे जलक्रीडाकेंद्र तसेच नोर्टव्हाइक आन झी व कार्टव्हाइक आन झी ही सागरी विश्रामगृहे हजारो पर्यटकांना आकृष्ट करतात. 

 गद्रे, वि. रा.