करमाळा : सोलापूर जिल्ह्यामधील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या १४,०५१ (१९७१). हे पुणे-सोलापूर लोहमार्गावरील जेऊर स्थानकाच्या उत्तरेस १९ किमी. असून मोटारवाहतुकीचे केंद्रस्थान समजले जाते. निंबाळकरांनी येथे किल्ला व भवानीचे मोठे देऊळ बांधले असून कार्तिक महिन्यात यात्रा भरते. ही पूर्वीपासून ज्वारी, बाजरी, कडधान्ये, तेल इत्यादींची मोठी व्यापारीपेठ असून हातमागाचे कापड, घोंगड्या आणि रंग यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील नगरपालिका १८६७ मध्ये स्थापन झाली असून येथे महाविद्यालय आणि शिक्षकप्रशिक्षण महाविद्यालय आहे.

शाह, र. रू.