सॉल्ट रेंज : पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या वायव्य भागात सिंधू व झेलम नद्यांच्या खोऱ्यांत पसरलेली डोंगररांग. या डोंगररांगेत विपुल सैंधव ( सॉल्टरॉक ) निक्षेप असल्याने तिला सॉल्ट रेंज हे नाव पडले आहे. हे जगातील एक समृद्घ सैंधव क्षेत्र आहे. या रांगेची निर्मिती कँब्रियन पूर्वकाळात झालेली असून तिची जाडी सु. ४९० मी. आहे. रांगेची पूर्व-पश्चिम लांबी सु. ३०० किमी. आणि रुंदी मध्य व पूर्वभागात सु. ८ ते ३१ किमी. आहे. तिची सरासरी उंची ६७० मी. असून पश्चिम भागातील सकेसर हे या रांगेतील सर्वोच्च ( सु. १,५०० मी.) शिखर आहे. ही रांग कमी उंचीच्या टेकड्यांची असून झिजेमुळे त्यांचे माथे सपाट पठारी बनले आहेत. या रांगेमध्ये दोन समांतर कटकांचा समावेश असून ते एका अनुदैर्घ्य दरीने एकमेकांपासून अलग झाले आहेत. रांगेच्या पूर्व भागात चेल किंवा चैल शिखर (१,१२८ मी.) असून उत्तरेकडील उतारावर खोल घळींमुळे उत्खातभूमी निर्माण झाली आहे. येथील हवामान हिवाळा सोडता इतर काळात उष्णकटिबंधीय व शुष्क असते. उन्हाळ्यात नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पर्जन्यवृष्टी होते.

निकृष्ट जमीन व सिंचनाच्या अभावी शेती व्यवसाय मर्यादित आहे. सोपान शेती काही प्रमाणात केली जाते आणि अनुदैर्घ्य खोऱ्यातील सरोवरे व पाण्याचे झरे यांमधून त्यांना काही प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो परंतु एकूण कोरडवाहू शेतीच अधिकतर आहे. सॉल्ट रेंजवर आफ्रिकन-अरेबियन व भूमध्यसामुद्रिक प्रकारातील वनस्पती आढळतात. दक्षिण भागात मरुवनस्पतींची तुरळक जंगले असून उत्तर भागात प्रामुख्याने सॅव्हाना प्रकारच्या वनस्पती आढळतात. याशिवाय बाभूळ, पाईन, वन्य ऑलिव्ह इ. वृक्ष जंगलात असून एकूण वनश्रीमध्ये खुरट्या वनस्पती, निवडुंग इ. आढळतात.

सैंधवव्यतिरिक्त या पर्वतश्रेणीत कोळसा, जिप्सम व अन्य खनिजेही आढळतात. दक्षिण उतारावर पाकिस्तानातील सर्वांत अधिक सैंधव, विशेषतः खेवरा, वार्च्छा आणि कालाबाग येथे मिळते तर कोळशाचे साठे दंतोत, पिढ आणि मकरवाल या ठिकाणी आढळतात. रांगेच्या पश्चिम भागातील चुनखडी व वालुकाश्मात खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यात आला आहे, तर पूर्व भागात डामरी खडक, डोलोमाइट व बॉक्साइट यांचे समुच्चय स्तर सापडले आहेत. जलालपूरजवळ उच्च प्रतीचे जिप्सम मिळते. चुनखडकाच्या खाणी, सैंधव व कोळसा यांपासून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होतो. या रांगेतील झेलम हे मोठे शहर असून अन्य गावे तेथील खाणकामगारांच्या वस्तीची आहेत. हे कामगार मुख्यत्वे भारतीय भाषा बोलतात. येथील लोकांचा प्रमुख धंदा मजुरी असून अत्यल्प प्रमाणात शेती व पशुपालन हे व्यवसाय दऱ्याखोऱ्यांतून चालतात.

पहा : पाकिस्तान.

कुंभारगावकर, य. रा.