बेलफास्ट : उत्तर आयर्लंडची राजधानी. अँट्रिम परगण्याचे हे मुख्य ठाणे अँट्रिम व डाऊन या दोन्ही परगण्यात मोडते. आयरीश समुद्राच्या बेलफास्ट लॉख भागात लॅगन नदीच्या मुखाशी हे शहर वसले आहे. लोकसंख्या ३,६३,००० (१९७६ अंदाज).

बेलफास्टचा स्थापना इ.स. ११७७ मध्ये झाली. १३ व्या शतकात येथे किल्ला बांधण्यात आला. १६८५ मध्ये फ्रांसच्या चौदाव्या लूईने तेथील प्रॉटेस्टंट लोकांचे धार्मिक स्वातंष्य हिरावून घेतल्यानंतर, आठराव्या शतकांत ह्यूजनॉट पंथाचे फ्रेंच प्रॉटेस्टंट लोक येथे मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले. हे लोक विणकर असल्याने येथे सुती वस्त्रे तयार होऊ लागली. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात (१८६१-६५) तेथून कापूस येणे बंद झाल्यावर येथील उद्योगधंद्याचे स्वरूप् बदलले. तागउद्योग व यांत्रिकी उद्योगधंदे उरयास आली. हे नैसर्गिक बंदर असल्याने जहाज बांधणी उद्योगासही चालना मिळाली. बेलफास्टमध्ये गालीचे, सुतळ्या व दोरा, सुती वस्त्रे, यंत्रे व त्यांचे सुटे भाग रेयॉन, विमान बांधणी, अन्नप्रक्रिया इ. उद्योगधंदे विकसित झालेले आहेत. ब्रिटनमधील औद्योगिक शहरांचा विकास त्याच्या कोळसा खाणीच्या सान्निध्यामुळे झाला असला तरी, लंडनप्रमाणे बेलफास्टही याला अपवाद आहे. बिंटनमधील सर्वातमोठी गोदी येथे आहे. (क्षेत्र १२० हे.). बंदरात मोठ्या बोटीदेखील येऊ शकतात.दोन्ही जागतीक महायुद्धात लढाऊ जहाजांना येथून युद्धसामुग्रीचा पुरवठा करण्यात आला. मे १९४१ मध्ये जर्मनांच्या तुफान बॉंबफेकीला हे शहर बळी पडले होते. बेलफास्ट जवळच उप्पर आयर्लंडमधील मोठे विजनिर्मीती केंद्र आहे.

उत्तर आयर्लंडच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनात या शहराला विशेष स्थान आहे. येथे क्विन्स विद्यापीठ आहे. अल्स्टर ग्रुप थिएटर तर्फे प्रादेशिक नाटके सादर केली जातात. बेलफास्ट आर्ट्‌स थिएटर प्रादेशिक नाटकांबरोबरच उत्तम परदेशी नाटकेही सादर करते. आयरिश लोककला वस्तुसंग्रहालय व उ. आयर्लंड कला परिषदेशी कलावीथी उल्लेखनीय आहेत. येथून दोन दैनिके, एक सायंदैनिक व एक साप्ताहिक प्रसिद्ध होते. बी.बी.सी. व आय्‌.टी.व्ही. (इन्डिपेन्डेन्ट टेलिव्हिजन) यांचे दुरदर्शन स्टुडिओ येथे आहेत. बेलफास्टमधील चर्चवास्तू व उद्याने शोभिवंत आहेत.

सुमारे ५५ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असणाऱ्या या शहराची बेसुमार वाढ रोखण्यासाठी १९६४ साली प्रादेशिक नियोजनाला सुरूवात झाली. शहराच्या आसपास नव्या नागरी वसाहती ष्थापून शहरातील गर्दी मर्यादित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बहुसंख्य प्रॉटेस्टंट पंथीय लोक व रोमन कॅथलिक पेथाचे अनूयायी यांच्यातील ताणतणवांनी व संघर्षाने नागरी जीवन ग्रासलेले आहे.

पंडित अविनाश यार्दी, ह. व्यं.