आरेकीपा: दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या १,९४,७०० (१९७०). अँडीज पर्वतातील चिली नदीच्या निसर्गरम्य खोऱ्यात २,३७५ मी. उंचीवर, लीमाच्या आग्नेयीस १५० किमी., पॅन अमेरिकन राजरस्त्यावर हे वसले आहे. स्पॅनिशांनी येथे १५४० मध्ये वसाहत केली परंतु त्याआधी इंका साम्राज्यातही यास महत्त्व होते. पॅसिफिकमधील ताजे मासे राजधानी कूस्को येथे पळत घेऊन जाणारे लोक येथे विश्रांती घेत. केचूआ या इंकांच्या भाषेतील ‘अरिकेपे’ (‘हो, थांबा ना!’) या शब्दावरून हे नाव पडले असावे.

या शहराच्या आसमंतात एल् मीस्ती (५,८५२ मी.), पिचुपिचु (५,६६९ मी.) व चाचानी ही हिमाच्छादित ज्वालामुखी शिखरे आहेत. एल् मीस्तीवर दोन वेधशाळा असून चाचानीवर हवामान निरीक्षण केंद्र आहे. पॅसिफिकवरील मोयेंदो व तितिकाका सरोवरावरील पूनो या बंदरांना जोडणाऱ्या लोहमार्गावर आरेकीपा महत्त्वाचे व्यापारकेंद्र आहे. दक्षिण पेरूतील मेंढ्या व अल्पाकाची लोकर व परिसरातील कापूस, धान्य, फळे, भाजीपाला इ. मालांची ही मुख्य बाजारपेठ आहे. येथे कापडगिरण्या, लोखंडाचे कारखाने, पिठाच्या गिरण्या, कातडी कमाविणे, दारू गाळणे, दूधदुभते, कापूस पिंजणे, अन्न-पदार्थ डबाबंद करणे इ. व्यवसाय चालतात. येथे विमानतळ असून १८२१ मध्ये स्थापलेले विश्वविद्यालय आहे. १८३८ मधील भूकंपाने शहर उद्ध्वस्त झाले होते. इंडियन लोक, रंगीबेरंगी बाजारपेठ, पांढऱ्या दगडाच्या इमारती व मोहक सृष्टिसौंदर्य यांमुळे हे प्रवाशांचे आकर्षण ठरले आहे.

शहाणे, मो. शा.