कोकण : भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अरुंद किनारी प्रदेशाचा मुख्यतः महाराष्ट्रातील भाग. महाराष्ट्रातील याचे क्षेत्रफळ ३०,४०० चौ. किमी. व लोकसंख्या एकट्या बृहन्मुंबईची ५९,७०,५७५ धरून १,०४,९३,३२३ (१९७१) आहे. पूर्वीच्या अनेक उल्लेखांप्रमाणे उत्तरेकडे दमणगंगा व दक्षिणेकडे काळी नदी असा याचा विस्तार मानला, तर दमणचे क्षेत्र ७० चौ. किमी. व लोकसंख्या ३८,७४१ गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०० चौ. किमी. व लोकसंख्या ७,९४,५७० कारवारची लोकसंख्या २७,७७७ आणि गोवे व कारवार यांदरम्यानच्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या यांची त्यात भर घालावी लागेल. याच्या पूर्वेस सह्याद्री आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. याची दक्षिणोत्तर लांबी सु. ५०० ते ६०० किमी. व रुंदी ५५ ते ६५, क्वचित ९६ किमी. पर्यंत आहे.

भूवर्णन : कोकणाचे ठाणे जिल्हा व बृहन्मुंबई मिळून झालेला उत्तर कोकण आणि कुलाबा व रत्नागिरी जिल्हे मिळून झालेला दक्षिण कोकण, असे दोन स्वाभाविक विभाग पडतात. दक्षिण कोकणात सह्याद्रीचे फाटे जवळजवळ समुद्रापर्यंत आलेले आहेत. उत्तर कोकणात त्यामानाने वालुकामय किनाऱ्याला समांतर सलग गाळजमिनीचा पट्टा असून त्याच्या पूर्वेस डोगरांची रांग व तिच्या पलीकडे वैतरणा नदीचे खोरे आहे. महाडच्या दक्षिणेस रत्नागिरी जिल्ह्यात जांभा खडक आढळतो. बाकी सर्वत्र बेसाल्ट खडक आहे. दक्षिण कोकणचा किनारा खडकाळ असून खाड्या व लहानलहान आखाते, उपसागर व काही ठिकाणी सुंदर पुलिने यांनी भरलेला आहे. किनाऱ्याजवळ मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, घारापुरी, अंजदीव ही बेटे आहेत. मुंबई व मार्मागोवा यांशिवाय मोठी नैसर्गिक बंदरे नाहीत. लहान लहान बंदरे पुष्कळ आहेत. सह्याद्रीमुळे पठारी भागाशी आलेला तुटकपणा व मिळणारे संरक्षण आणि डोंगरांच्या आश्रयाने छोट्या बंदरांतून मिळणारा निर्वेध आसरा, यांमुळे किनाऱ्यावर चाचेगिरीला नेहमीच वाव मिळत आला आहे आणि आजही चोरट्या व्यापाराला अनुकूल जागा या किनाऱ्यावर पुष्कळ आहेत. मुंबईजवळच्या समुद्रात बुडालेल्या अरण्यांच्या अवशेषांवरून तेथील किनाऱ्याचे निमज्जन झाले असावे असे दिसते. प्राचीन ज्वालामुखी क्रियेचे अवशेष कोकणात गरम झऱ्यांच्या रूपाने अनेक ठिकाणी दिसतात. त्यात वज्रेश्वरीजवळचे झरे विशेष प्रसिद्ध आहेत.

दमणगंगेपासून दक्षिणेस वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, भोगावती, सावित्री, गायत्री, वाशिष्ठी, शास्त्री, मांडवी, जुआरी व कारवारजवळील काळी या कोकणातील लहान मोठ्या प्रमुख नद्या होत. त्या लांबीला कमी, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या, उन्हाळ्यात शुष्कप्राय होणाऱ्या आहेत. वैतरणा व तानसा यांचे पाणी अडवून मुंबईला पुरविले आहे. काळी नदीवर कर्नाटकात मोठी योजना मूर्त स्वरूप घेत आहे. इतर नद्यांचा अधिक उपयोग करता येण्याजोगा आहे. ठाणे जिल्ह्यात पोखरण, विहार, तुळशी, रत्नागिरी जिल्ह्यात धामापूर, सावंतवाडीचा मोती हे तलाव आहेत. खोपोली, भिरा, भिवपुरी, पोफळी इ. वीजघरांतून सोडलेले पाणीही उपयोगी पडते.

कोकणाचे हवामान उष्ण व दमट आहे. ते डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सुखद-शीतल असते. एरवी तपमान सामान्यतः २१ – २२ से. असते. जोरदार नैर्ऋत्य मोसमी वारे हे येथील वैशिष्ट्य आहे. या वाऱ्यांमुळे समुद्र इतका खवळतो, की किनारी सागरी वाहतूक त्यावेळी बंद ठेवावी लागते. हे वारे कोकणाला भरपूर पाऊस देतात. तथापि त्याचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी कमी होत जाते. गोव्यास ३०० सेंमी., रत्नागिरीला २५० सेंमी., तर मुंबईस १७५ सेंमी. पाऊस पडतो. डोंगरउतारावर अधिक पाऊस पडतो. महाबळेश्वर येथे ५०० ते ६२५ सेंमी. पाऊस पडतो.

कोकणातील सु. ४० टक्के भाग अरण्यमय आहे. त्यात सदाहरित व पानझडी अशी दोन्ही प्रकारची झाडे आढळतात. साग, ऐन, खैर, शिसवी, बांबू, धावडा, किंजळ, हिरडा, अष्टा, पिंपळ, उंबर, उंडिणी, आवळा, सागरगोटा इत्यादींबरोबर जांभूळ, आंबा, फणस, काजू, कोकम वगैरे अनेक प्रकारची फळझाडे व समुद्रकिनाऱ्याजवळ नारळ व सुपारीची झाडे येथे आहेत. उत्तर कोकणात ताडाची व खजुरीचीही बने आहेत. सर्पगंधा, गुळवेल, बाहावा, अनंतमूळ, वावडिंग, बेहडा, बिब्बा, जितसाया, कुडा इ. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि काही विषारी वनस्पतीही येथे आढळतात. खाडीमुखांजवळील खारकच्छ वनस्पती जळण म्हणून उपयोगी येतात. लोणारी कोळसा, जळण, इमारती लाकूड, आपट्याची व टेंभुर्णीची पाने, मध, मेण, डिंक, इ. पदार्थ जंगलात मिळतात. गोवे निसर्गसौंदर्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहे. उत्तर कोकणचा उत्तरभाग गवताळ आहे.

या जंगलात वाघ, अस्वल, रानडुक्कर क्वचित गवा, कोल्हा, तरस, खोकड, वानरे, माकडे, मुंगूस, खार, साळिंदर, ससा, हरिण व सांबर वगैरे वन्यपशू नाग, फुरसे, नन्नाटीसारखे विषारी सर्प घार, गिधाड, चित्तर, मोर इ. पक्षी आणि विविध प्रकारचे कीटक, असे बहुविध प्राणी आढळतात.

रेडीजवळ आणि मालवण व रत्नागिरीजवळ लोहधातुक सापडते. बांदा व फोंड्याजवळ मँगॅनीज व ठाणे, कुलाबा, रत्नागिरी जिल्ह्यांत बॉक्साइट मिळते. कणकवलीजवळ क्रोमाइट, रत्नागिरीजवळ इल्मेनाइट व अनेक ठिकाणी काचेसाठी लागणारी वाळू ही इतर खनिजे आहेत. बेसाल्ट व जांभा दगड यांचा उपयोग रस्ते व घरे बांधण्यासाठी होतो.


इतिहास : प्राचीन ग्रंथांत इ.स.पू. चौथ्या शतकापासून कोकणचा उल्लेख आढळतो. महाभारत, हरिवंश, विष्णुपुराण, बृहत्संहिता, राजतरंगिणी, पेरिप्लस इ. ग्रंथ चालुक्यांचे शिलालेख प्लिनी, टॉलेमी, स्ट्रेबो, ह्युएनत्संग, इब्न बतूता, अल् बीरूनी यांच्या वृत्तांतांत कोकणचा उल्लेख आहे. भडोचच्या दक्षिणेची केरळपर्यंतची भारताची पश्चिम किनारपट्टी अपरांत म्हणून ओळखली जाई. टॉलेमीने गुजरात व उत्तर कोकण यांस लारिका व दक्षिण कोकणास आरिका म्हटले आहे. इ.स.पू. पाचव्या शतकापासून बॅबिलन, रोम इत्यादींशी भडोच, चेऊल, वनवासी, नवसारी, सोपारा, बालेपाटण, चंद्रपूर, कल्याण या व्यापारी केद्रांचा संबंध होता. कोकण हे नाव कसे पडले याविषयी अनेक मते आहेत. परशुरामाची माता कुंकणा यावरून कोकण नाव पडले असावे असे एक मत आहे. कोकणातील शिलालेख व ताम्रपटादी साधनांवरून असे दिसते, की एकेकाळी साष्टी व मुंबईच्या दक्षिणेकडील काही भागांत बौद्धांचे वर्चस्व असावे. इ.स.पू. दुसऱ्या व तिसऱ्या शतकांत येथे मौर्य राजांचा अंमल होता. सोपारा ही अशोकाची या भागातील राजधानी असावी, असे प्राचीन साहित्यावरून वाटते. पहिल्या शतकात येथे सातवाहनांचे अधिराज्य आले. हेच पुराणातील आंध्रभृत्य होत. त्यांचे राज्य तिसऱ्या शतकापर्यंत टिकले. चौथ्या व पाचव्या शतकांत कलचुरी राजे, सहाव्या शतकात पुन्हा मौर्य, सातव्या शतकात चालुक्य व ८१० ते १२६० पर्यंत वीस शिलाहार राजे येथे झाले. देवगिरीचा महादेव यादव (१२६०–७०) याने स्वारी करून कोकण आपल्या राज्यास जोडले. १३४७ मध्ये नागरदेव यादवाचा गुजरातच्या सुलतानाने पराभव केला, तेव्हापासून १६०० पर्यंत बहामनी, आदिलशाही, निजामशाही इत्यादींच्या मुसलमानी सत्ता कोकणात निरनिराळ्या भागांत टिकल्या. स्थानिक कारभार मात्र देसाई, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी इ. हिंदू अधिकाऱ्यांकडे असे. सिद्दी १५०० च्या सुमारास जंजिऱ्यास आले असावे. मुसलमानी सैन्यात अधिकाराच्या जागांवर बरेच सिद्दी होते. त्या काळी चेऊल आणि दाभोळ ही मोठी बंदरे सुरत व गोवे यांच्या बरोबरीची होती. त्यांशिवाय डहाणू, तारापूर, केळवे, अगाशी, वसई, वांद्रे, माहीम, नागोठणे, श्रीवर्धन, जैनापूर, खारेपाटण, राजापूर ही गावे महत्त्वाची होती. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज कोकणात आले व तेथील सत्ताधीशांच्या आपसांतील भांडणाचा फायदा घेऊन प्रबळ झाले. व्यापारापेक्षाही धर्मप्रसाराकडे त्यांचा अधिक कल होता. गोवे व वसई येथे त्यांनी पक्के पाय रोवले. धर्मछळामुळे प्रजा त्यांच्येवर असंतुष्ट होती. नवीन आलेले इंग्रज व डच हे यूरोपीयही त्यांना शत्रुवत होते. १६६१ मध्ये पोर्तुगीजांकडून इंग्रजांस मुंबई बेट आंदण मिळाले व १६६३ मध्ये डचांनी पोर्तुगीजांकडून कोचीन घेतले. तेव्हा गोवे व वसई या भागांतच पोर्तुगीजांचे वर्चस्व राहिले. १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने वसई घेतल्यावर ते फक्त गोव्यातच राहिले आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने १९६१ मध्ये गोवे जिंकून घेतल्यावर कोकणातील पोर्तुगीज सत्ता नष्ट झाली. गोव्याशिवाय साष्टी, वसई, ठाणे, रेवदंडा वगैरे भागांत त्यांच्या सत्तेचे अवशेष किल्ले, बुरूज, प्रार्थनामंदिरे इ. रूपांनी दिसतात. शिवाजी महाराजांच्या काळात कोकणला महत्त्व आले व पेशव्यांच्या कारकीर्दीत ते अधिकच वाढले. शिवाजीने रायगड, बिरवाडी, लिंगाणा, प्रतापगड इ. डोंगरी किल्ले तसेच सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी, जयगड, अंजनवेल, कुलाबा, विजयदुर्ग इ. सागरी किल्ले बांधले किंवा दुरुस्त केले. मालवण येथे आपल्या आरमाराचे ठाणे केले. पद्मगड येथे त्याचा जहाजे बांधण्याचा कारखाना होता. कल्याण प्रांत घेतला. मोगल व सिद्दी यांच्याशी लढाया दिल्या. पोर्तुगीज व इंग्रज यांनाही शह देऊन जेरीस आणले. कारभाराची घडी पूर्वीपेक्षा अधिक चांगली बसवून प्रजेस सुखी केले. दाभोळ, कल्याण, वसई, राजापूर, महाड ही गावे त्यावेळी भरभराटीची होती. संभाजीनेही कोकणात आपला दबदबा ठेवला होता. अठराव्या शतकात सरखेल आंग्रे यांनी आपल्या प्रबळ आरमाराच्या जोरावर मुंबई ते सावंतवाडीपर्यंतच्या सर्व कोकणावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्याने सिद्दी, मोगल, इंग्रज व पोर्तुगीज या सर्वांस दहशत बसविली होती. पेशव्यांनी सिद्यांकडील मुलूख परत मिळविला. पोर्तुगीज गोव्यात हटले. इंग्रज मुंबईस राहिले व जंजिरा आणि जव्हार येथील छोटी राज्ये सोडून बहुतेक सर्व कोकण १७४१ च्या सुमारास मराठ्यांच्या ताब्यात आले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठेशाही कमकुवत झाल्यावर इंग्रज, सिद्दी, सावंतवाडीकर इत्यादींच्या कटकटी वाढल्या. दुसऱ्या बाजीरावाने कधी इंग्रजांशी गोडी करून, तर कधी त्यांची नाकेबंदी करून काही मुलूख राखण्याचा प्रयत्न केला. परंतु १८१८ च्या सप्टेंबरात कोकण इंग्रजांच्या ताब्यात गेले ते १९४७ मध्ये भारताचे झाले. इंग्रजी अंमलाखाली कोकणचा कारभार सुरळीत चालला तरी वैभव कमी झाले. मराठ्यांच्या सैन्यात कोकणातील बरेच लोक असत. ते परत आले. मराठी राज्य नष्ट झाल्यामुळे कोकणी मालाची मागणी कमी झाली डोंगराळ प्रदेश, नापीक व खाऱ्या जमिनीचे अधिक प्रमाण, इतर उत्पादन साधनांचा व मुख्यत: दळणवळण साधनांचा अभाव आणि कर व सारा यांची वाढ, यांमुळे कोकण हा एक दरिद्री प्रदेश गणला जाऊ लागला. मोठ्या आगबोटी आल्यामुळे मुंबई व मार्मागोवा या खोल पाण्याच्या बंदरांशिवाय इतर लहान बंदरांचे विदेशव्यापारदृष्टीने महत्त्व कमी झाले. मुंबईची मात्र वेगाने भरभराट झाली आणि कोकणातील लोकांचे ते एक मोठे आश्रयस्थान बनले. अलीकडे खनिजांचा शोध व फलसंशोधन, मत्स्यसंशोधन, खारजमीन सुधारणा, भातसंशोधन, वनवर्धन, मोटारवाहतूक आणि कोकणरेल्वे होण्याची आशा, यांमुळे कोकणाला पुन्हा चांगले दिवस येण्याचा संभव दिसत आहे.

कुमठेकर, ज. ब.