पलायनकोट्टाई :पालमकोटा. तमिळनाडू राज्याच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक, व्यापारी व शैक्षणिक केंद्र. लोकसंख्या ७०,०७० (१९७१). तिरुनेलवेलीच्या पूर्वेस सु. ४ किमी. वरील हे शहर ताम्रपर्णी नदीकाठी वसले असून, दक्षिण लोहमार्गावरील  व मद्रास–कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. येथे १८६६ साली नगरपालिकेची स्थापना झाली. हे ख्रिस्ती मिशनचे द. भारतातील मुख्य केंद्र आहे. येथे खिस्ती शाळा, तीन खिस्ती महाविद्यालयांपैकी एक मुलींचे महाविद्यालय, मदुराई विद्यापीठाला जोडलेले हिंदूंचे मानव्य महाविद्यालय इ. शैक्षणिक सोयी आहेत. कापड व ताडी ही याच्या आसमंतातील प्रमुख उत्पादने होत. आल्हाददायी हवामानामुळे पलायनकोट्टाई हे पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनले आहे.

चौधरी, वसंत