ब्रेमर हेवेन : पश्चिम जर्मनीचे सर्वांत मोठे मच्छिमारी आणि प्रवासी वाहतूक बंदर. लोकसंख्या १,३८,९८७ (१९७९ अंदाज). याच्या दक्षिणेस ७४ किमी. अंतरावर असलेल्या ब्रेमेन या मोठ्या बंदराचे हे पूरक बंदर होय. उत्तर समुद्राला मिळणाऱ्या बेझर नदीच्या मुखावर इ. स. १८२७ मध्ये ब्रेमेनचा महापौर योहान्नेस श्मिट याने हे वसविले. यूरोप आणि अमेरिका यांमधील जहाजवाहतूक १८४७ मध्ये प्रथम येथूनच सुरू झाली. १८५७ मध्ये ‘नॉर्थ जर्मन लॉइड शिपिंग कंपनी’चे मुख्य ठाणे येथे आल्यानंतर अटलांटिकमार्गे होणारी वाहतूक खूपच वाढली. १९३९ साली ते बेझरमुंड या शेजारच्या शहरात विलीन करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात ते दोस्त राष्ट्रांच्या बाँबहल्ल्याचे विशेष लक्ष्य बनले होते. तथापि तेथील गोद्यांचे फारसे नुकसान न होता अमेरिकी सैन्यदलाला त्यांचा चांगला उपयोग झाला. १९४७ मध्ये ते ‘ब्रेमरहेवेन’ नावाने ब्रेमेन राज्यात सामील करण्यात आले. येथे मासेमारीबरोबरच माशांवरील प्रक्रिया तसेच डबे, पिंपे व माशांची जाळी तयार करणे, जहाजबांधणी व दुरुस्ती हे उद्योगधंदेही चालतात. या बंदरातून मुख्यत्वे प्रवासी वाहतूक व ब्रेमेनहून मालवाहतूक केली जाते. येथे नौकानयन व सागरी अभियांत्रिकीचे शिक्षण देणारी संस्था, महासागरविज्ञान संस्था, मत्स्यविषयक प्रदर्शन आणि उत्तर समुद्र जलचर संग्रहालय आहे.

शहाणे, मो. शा.