अनंतनाग : जम्मू-काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या २७,५६९(१९७१). हे काश्मीरच्या दरीत, जेहलम नदीकाठी, श्रीनगरच्या आग्नेयीस ५५ किमी. आहे. काश्मीरी भाषेत नाग याचा अर्थ ‘झरा’ असा होतो. या शहरात अनेक झरे असल्यामुळे ‘अनंतनाग’ असे नाव पडले. याला इस्लामाबाद असेही म्हणतात. काश्मीरच्या दरीतील मोठ्या बोटी येथपर्यंत येतात. भात, मका, तेलबिया, केशर, गहू यांचा व्यापार येथे चालतो. कशिदाकाम, लाकडावरील कोरीवकाम व कागदी लगदाकाम ह्यांसाठी शहर प्रसिद्ध असून त्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.

येथील नागबल या हिंदुतीर्थाच्या ठिकाणी गंधकमिश्रित पाण्याचे झरे असून त्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे सांगण्यात येते. अमरनाथच्या यात्रेसाठी जाणारे लोक प्रथम येथे थांबतात. याच्या आग्नेयीस ८ किमी. असलेल्या अच्छीबल येथे काश्मीरमधील सर्वांत मोठा झरा आहे. शालिमारची छोटी आवृत्ती असलेली एक बाग अच्छीबलला असून तेथे मत्स्यपालनकेंद्र आहे. अंनतनागच्या पूर्व-ईशान्येस सहा किमी. वर मार्तंड पठराजवळील सूर्यमंदिर प्रसिद्ध आहे. अनंतनागपासून अवंतिपूर, कोकरनाग, व्हेरनाग, मत्तन या स्थळांना जाण्यासाठी सडका आहेत.

दातार, नीला