काठमांडू : नेपाळची राजधानी व मुख्य व्यापारी शहर. लोकसंख्या १,५३,४०५ (१९७१). हे समुद्रसपाटीपासून १,३२१.५ मी. उंचीवर विष्णुमती व बाधमती नद्यांच्या संगमाजवळ, भारताच्या सीमेपासून सु.१२० किमी. दूर आहे. मंजुपट्टन, कांतिपूर ही काठमांडूनची प्राचीन नावे. हल्लीचे शहर राजा गुणकामदेव याने ७२३ मध्ये वसविले. मल्ल राजा लक्ष्मणसिंह किंवा लक्ष्मींद्र याने १५९६ मध्ये बांधलेल्या भव्य लाकडी मंदिरावरुन (काष्ठमंडप) काठमांडू नाव रुढ झाले. शहराभोवती पूर्वी तट होता व त्याला बत्तीस वेशी होत्या. शहराचे बत्तीस विभाग असून त्यांना `टोल’ अशी संज्ञा होती. आधुनिक इमारती पाश्चात्य धर्तीच्या आहेत. जुन्या शहरातील रस्ते अरुंद असून, लाल विटांची तीनचार मजली कौलारु घरे सर्वत्र दिसतात. घरबांधणीत लाकडाचा पुष्कळ वापर असून त्यावर सर्वत्र प्रेक्षणीय कोरीवकाम दिसते. प्राचीन मल्ल राजाचा भव्य राजवाडा ही जुन्या शहरातील विख्यात वास्तू असून, लगतच राजा मेंद्रमल्लाने बांधलेले तल्लिजुदेवीचे मंदिर (तुळजा भवानी) काठमांडूमधील सर्व देवळांत मोठे प्रेक्षणीय आहे. राजवाडयाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ हनुमानाची प्रचंड मूर्ती असून त्यावरुन याच्या समोरच्या चौकास हनुमानताल म्हणतात. या चौकात ब्रह्मी पॅगोडा शैलीत बांधलेली अनेक देवळे असून काळभैरवाची काळ्या दगडाची भव्य मूर्ती आहे. जुन्या राजवाडयाच्या पूर्वेस तुंडीखेल म्हणजे कवायतीचे मैदान असून, त्याच्या मध्यभागी असलेल्या वृक्षाभोवती लष्करी संचलनाच्या निरीक्षणार्थ उंच दगडी ओटा बांधला आहे. जुन्या शहरालगतच राणा लोकांनी बांधलेले अनेक भव्य महाल दिसतात.

शहराच्या पूर्वेस पाच किमी. अंतरावर काठमांडूचा विमानतळ असून, तेथून नेपाळातील प्रमुख शहरी व भारताशी हवाई प्रवास सुलभतेने चालतो. काठमांडू-ल्हासा व काठमांडू-रक्षौल सडकांमुळे तिबेट व भारत यांमधील खुष्कीची प्रवास-वाहतूक सुलभतेने होते.

खुद्द काठमांडूत व शहराच्या परिसरात हिंदूंची व बौध्दांची अनेक देवळे आणि तीर्थस्थाने आहेत. पशुपतिनाथ हे प्रख्यात शिवालय शहरापासून चार किमी. वर आहे. स्वयंभूनाथ, बोधनाथ ह्या बौध्द पवित्र स्थानांच्या दर्शनार्थ तिबेट, जपान वगैरे देशांतून दरवर्षी हजारो यात्रेकरु येतात.

काठमांडूचे कुटीरोद्योग विख्यात असून येथील लाकडाच्या कलापूर्ण वस्तू, कातडी काम, कापडी जोडे, लोकरी कपडे, गालिचे, विविध धातूंची भांडी इत्यादींना चांगली मागणी असते. अलीकडे नेपाळात शिक्षणाचाही बराच प्रसार झाला असून, प्राथमिक व माध्यमिक विद्यालये व ग्रंथालये काठमांडूत सर्वत्र दिसतात. त्रिभुवन विद्यापीठामुळे (स्थापना १९५८) उच्च शिक्षणही सुलभ झाले आहे.

चीन व भारत ह्यांमधील मध्यस्थित राज्याची ही राजधानी असल्याने काठमांडूला राजकीय वर्तुळात महत्व आहे.

ओक, द.ह.