कंदाहार : अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व कंदाहार प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७,२४,००० (१९६९). प्राचीन भारतातील गंधार देशात हा भाग समाविष्ट होता. समुद्रसपाटीपासून सु. १,०१० मी. उंचीवरील हे शहर काबूलच्या नैर्ऋत्येस ५१२ किमी. असून हेरात व पाकिस्तानातील क्वेट्टा ह्यांना जोडणाऱ्या मोक्याच्या मार्गावर वसलेले आहे. अलेक्झांडरने हे शहर प्रथम वसविले असे म्हणतात. अहमदशाह दुर्रानीने (१७२४ — ७३) राजधानी म्हणून वसविलेल्या जुन्या शहराभोवती मातीचा प्रचंड तट व खंदक असून पश्चिमांगास नवे शहर आहे. तेथे चित्रपटगृह, शाळा व नवीन धर्तीच्या वास्तू आहेत. वास्तुशास्त्रदृष्ट्या जुन्या शहरातील अहमदशाहची कबर उल्लेखनीय आहे. खिर्कच्या मशिदीत मुहंमद पैगंबराचा पवित्र अंगरखा असावा असे म्हणतात. शहराच्या पश्चिमेकडील टेकडीवजा ठिकाणावर बाबर व अकबरकालीन कोरीव लेख आहेत. जवळच सम्राट अशोककालीन शिलालेखही सापडतात.

हे शहर देशातील एक प्रमुख व्यापारी केंद्र असून येथे रेशमी, सुती, लोकरीचे आणि फळफळावळ टिकविण्याचे कारखाने आहेत. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळही बांधण्यात आला आहे.

दिवाकर, प्र. वि.