भामो : ब्रह्मदेशाच्या काचीन राज्यातील इतिहासप्रसिद्ध व्यापारी शहर. लोकसंख्या १६,००० (१९६० अंदाज). इरावती नदीच्या डाव्या काठावर, इरावती व चीनच्या युनान प्रातांतून आलेली दाबिंग या नद्यांच्या संगमाजवळ डोंगराळ प्रदेशात हे शहर वसलेले असून ते चीनच्या सरहद्दीपासून फक्त ६५ किमी. अंतरावर आहे. शिवाय इरावती नदी तिच्या मुखापासून या शहरापर्यंत (सु. १,४५० किमी.) नौसुलभ असल्याने देशातील अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

इतिहासकाळापासून चीनशी होणाऱ्या व्यापारमार्गावरील ब्रम्हदेशातील हे अंतिम स्थानक असल्याने त्यास महत्त्व होते. याचा निर्देश पंधराव्या शतकातील एका नकाशात आढळतो. चिनी यात्रेकरू भारतात युनान-भामोमार्गे येत असत एसा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी हे शान राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. ‘बर्मा रोड’ होण्यापूर्वी (१९३८) पश्चिमेकडील देशांशी जलमार्गाने वाहतूक करण्याच्या दृष्टीने चीनला हे अत्यंत सोयीचे होते. दुसऱ्या महायुद्धकाळात बाधण्यात आलेल्या (१९४२) ‘स्टिलवेल रोड’ या रसद मार्गाने ते भारताच्या आसाम राज्यातील लेडो शहराशी व बर्मा रोडशी जोडले गेले. युद्धकाळात चीनमधील दोस्तराष्ट्रांच्या सैन्याला येथूनच रसद पुरविली जाई. १९४२ मध्ये हे जपानच्या ताब्यात होते.

शहराच्या परिसरात सागाची जंगले असून भात, तंबाखू यांचे उत्पादनही घेतले जाते. यांशिवाय येथील माणकाची खाणही प्रसिद्ध आहे. शहरात काचीन तसेच चिनी लोकांचे प्रमाण जास्त असून येथील साखर कारखाना, थाई शैलीतील पॅगोडा उल्लेखनीय आहेत.

चौडे, मा. ल.