आन्हवे: पूर्व चीनमधील प्रांत. क्षेत्रफळ ८८,८३७ चौ. किमी. लोकसंख्या ३,५०,००,००० (१९६८ अंदाज). राजधानी होफी. याच्या उत्तरेस जिआंगसू, पूर्वेस जिआंगसू व जजिआंग, दक्षिणेस जिआंगसी व पश्चिमेस हुपे व होनान प्रांत आहेत. हवामानाच्या दृष्टीने व यांगत्सी नदी आणि तापेह डोंगर यांमुळे उत्तर व दक्षिण असे या प्रांताचे दोन स्पष्ट भाग पडतात. उत्तर भाग उत्तर चीन मैदानात असून त्यातून ह‌्वाय नदी वाहते. येथील हिवाळा विशेष थंड असून हवा वर्षभर कोरडी असते. गहू, केओलियांग, सोयाबीन, रताळी व कापूस ही या भागातील मुख्य पिके आहेत. ह्‌वाय नदीवर अनेक बहु-उद्देशी धरणे बांधलेली आहेत. दक्षिण भागातून यांगत्सी वाहते. येथील हवामान दमट व उष्ण असते. प्रसिद्ध कीमुन चहा, तुंगतेल, बांबू, बार्ली, तांदूळ, ऊस यांचे येथे मोठे उत्पादन होते. येथील पाइन जंगलापासून सुप्रसिद्ध इंडिया इंक तयार करतात. या भागात तुतीची लागवड सर्वत्र असून रेशीम उत्पादन होते. कोळसा व लोखंड ही खनिजे प्रांतात विपुल आहेत. पेंगपू व होफी ही औद्योगिक केंद्रे उदयास येत आहेत. सडका, नानकिंग-शांघाय लोहमार्ग, यांगत्सी व ह्‌वाय नद्यांना जोडणारे कालवे इत्यादींमुळे मालाची वाहतूक सुलभतेने होते. यांगत्सीत मोठ्या आगबोटीतूनही वाहतूक होते. १९५५ मध्ये आन्हवेचा काही भाग जिआंगसूला जोडण्यात आला.

ओक, द. ह.