कॉन्स्टांट्सा : रुमानियाचे काळ्या समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या १,६१,६२७ (१९६८). हे बूखारेस्टच्या पूर्वेस २०० किमी., डॅन्यूब नदीच्या त्रिभुजप्रदेशाच्या दक्षिणेस ९६ किमी. आहे. येथून खनिज तेल, धान्ये, लाकूड, खाद्यपदार्थ वगैरे माल निर्यात होतो. लोहमार्गाचेही हे एक केंद्र असून येथे रुमानियाचा प्रमुख नाविक व हवाई तळ आहे. विटा आणि कौले, फर्निचर, धातूंच्या वस्तू, साबण, दोरखंडे, कापड, कातडी कमावणे, फळे, मांस व धान्ये यांच्यावरील प्रक्रिया इ. उद्योग येथे आहेत. बंदरापर्यंत प्लोएस्टी या पेट्रोलियम केंद्रापासून तेलनळ आलेला असून बंदरात मोठमोठ्या गोद्या व बोटीत नळाने धान्य भरण्याच्या उंच इमारती आहेत. ख्रिश्चन, यहुदी व मुसलमान पंथीयांची येथे मोठमोठी प्रार्थनामंदिरे आहेत. बायझंटिन व रोमन अवशेष, उत्कृष्ट पुलिन, विश्रामगृहे यांसाठी हौशी प्रवासी येथे येतात.

 

लिमये, दि. ह.