अनोमा : बौद्ध साहित्यात निर्देशिलेली भारतातील एक पवित्र नदी. प्राचीन साहित्यात हिची हो-नन्-चिअँग, अनोम, अनोमिय, अनुवनिय, अनुमनिय अशी नामांतरे आढळतात. ‘अनोम’ चा शब्दशः अर्थ ‘दैदिप्यमान’ वा ‘छोटी नदी’. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात उगम पावून गोरखपूर जिल्ह्यातील सोहगौर गावनजीक रावी नदीस येऊन मिळणारी आधुनिक औमी नदी हीच अनोमा असावी, असे कनिंगहॅम मानतो. राज्यत्याग केल्यावर गौतम बुद्ध प्रथम येथे आला, त्याने राजवस्त्रे उतरून कषाय वस्त्रे धारण केली व तापसी जीवनाला प्रारंभ केला. असा बौद्ध साहित्यात उल्लेख आहे. कपिलवस्तूपासून अनोमा सहा योजने आहे, असाही त्यात उल्लेख आढळतो. या वर्णनावरून आधुनिक ओमी हीच अनोमा असावी.

शाह, र.रू. जोशी, चंद्राहस