सामुद्रधुनी : दोन मोठे जलाशय जोडणाऱ्या व खाडीपेक्षा अरुंद (लहान) असलेल्या परिवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. ही संज्ञा मुख्यत्वे दोन समुद्रांना जोडणाऱ्या जलाशयाच्या चिंचोळ्या भागास वापरली जाते. लष्करीदृष्ट्या भूराजकीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारीदृष्ट्या सामुद्रधुनीस फार महत्त्व आहे. सामुद्रधुनी हे नाव पूर्वी विशेषतः ⇨जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीसाठीच वापरले जात असे. नंतर मलॅका या सामुद्रधुनीसाठी ते वापरले जाऊ लागले.

भूमध्य समुद्र हा सर्वांत मोठा भूवेष्टित समुद्र जिब्रा ल्टरच्या सामुद्रधुनीने पश्चिमेकडील अटलांटिक महासागराशी जोडला आहे. या सामुद्रधुनीतूनच आंतरराष्ट्रीय व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा असा ⇨सुएझ कालवा हा सागरीमार्ग जातो. या मार्गावरील जिब्राल्टर हे व्यापारीदृष्ट्या आणि त्याहीपेक्षा लष्करीदृष्ट्या मोक्याचे ठिकाण आहे. जगातील भिन्न राष्ट्रांना जोडणारे एक प्रमुख ‘प्रवेशद्वार’ असा या सामुद्रधुनीचा उल्लेख केला जातो.

आग्नेय आशियातील मलाया द्वीपकल्प व इंडोनेशियाचे सुमात्रा बेट यांदरम्यानच्या तसेच हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडणाऱ्या अरुंद सागरी भागास ‘मलॅका सामुद्रधुनी’ असे म्हणतात. मलॅका बंदरावरुन या सामुद्रधुनीस मलॅका सामुद्रधुनी हे नाव पडले आहे. पूर्वीपासून या सामुद्रधुनीचा व्यापारी मार्ग म्हणून उपयोग करण्यात येत आहे. या सामुद्रधुनीवर सुरुवातीस अरब, पोर्तुगीज, डच व ब्रिटीश यांचे नियंत्रण होते. ब्रिटिशांनी या सामुद्रधुनीच्या उत्तरेकडील पिनँग बेटावर व दक्षिणेकडील सिंगापूरवर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यावेळी या वसाहती सामुद्रधुनी वसाहती म्हणून प्रसिद्घ होत्या. जगातील एक महत्त्वाचा जलमार्ग व भारत-चीन यांच्यातील सागरी वाहतूकीचा जवळचा मार्ग म्हणून ही सामुद्रधुनी प्रसिद्घ आहे. [⟶ मलॅका सामुद्रधुनी].

इजीअन समुद्र व मार्मारा समुद्र यांस जोडणारी ⇨दार्दानेल्स सामुद्रधुनी हीसुद्घा लष्करीदृष्ट्या फार महत्त्वाची आहे. १४५३ ते १७७४ या काळात तुर्कस्तानने या सामुद्रधुनीचा वापर करण्यास इतर देशांना मनाई केली होती, तेव्हापासून या सामुद्रधुनीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. पहिल्या महायुद्घात इंग्रजांनी या सामुद्रधुनीतून दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांना मार्ग खुला करण्याचे प्रयत्न केले. तसेच नाटो लष्करी संघटना व हिंदी महासागरातील बड्या देशांच्या नाविक हालचाली या दृष्टीनेही या सामुद्रधुनीचे महत्त्व खूपच आहे. रशियाच्या व्यापारी व नौदल जहाजांना काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्र व हिंदी महासागराकडे येण्याचा हा एकच जलमार्ग आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार ही सामुद्रधुनी व्यापारासाठी सर्वांना खुली आहे. या सामुद्रधुनीवर गलिपली, एजेआबात, चानाक्काले ही प्रमुख बंदरे आहेत.

काळा समुद्र व मार्मारा समुद्र यांस जोडणारी ⇨बॉस्पोरस सामुद्रधुनी ही मोक्याच्या ठिकाणी असल्याने लष्करीदृष्ट्या महत्त्वाची असून आशियाई तुर्कस्तानास यूरोपीय तुर्कस्तानापासून विभक्त करते. बायझंटिन सम्रा टांनी, ऑटोमन सुलतानांनी व तुर्कस्तान सरकारने हिच्या किनारी भागात तटबंदी करून किल्ले बांधलेले होते. ऑटोमन सत्तेच्या ऱ्हासानंतर यूरोपियनांनी या भागावर वर्चस्व प्रस्थापित केले आणि वेळोवेळी तुर्कस्तानाशी करार केले. १९३६ च्या करारान्वये या सामुद्रधुनीचे हक्क तुर्कस्तानास मिळाले. मासेमारी व निसर्गसौंदर्य यांसाठी ही सामुद्रधुनी विशेष प्रसिद्घ आहे. इस्तंबूल ( पूर्वीचे कॉन्स्टँटिनोपल ), उस्कूदार ही या सामुद्रधुनीच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत. सप्टेंबर १९६६ मध्ये बॉस्पोरस सामुद्रधुनी पोहत जाणारे मिहिर सेन हे पहिले भारतीय होत.

भारताचे आग्नेय टोक व श्रीलंकेचा उत्तर भाग यांदरम्यानच्या चिंचोळ्या सागरी भागास ⇨पाल्क सामुद्रधुनी असे म्हणतात. रॉबर्ट पाल्क या मद्रासच्या गव्हर्नरच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे नाव दिले आहे. उथळ समुद्र, प्रवाळ बेटे, जलमग्न चुनखडक, जोरदार सागरी प्रवाह व वादळी ईशान्य मोसमी वारे यांमुळे बऱ्याच वेळा पाल्क सामुद्रधुनीजवळ मोठ्या जहाजांना मार्ग काढणे अवघड जाते म्हणून लहान लहान जहाजांतून वाहतूक केली जाते. श्रीलंकेचे जाफना हे महत्त्वाचे बंदर पाल्कच्या उपसागरावरच आहे. येथे विविध प्रकारचे शंख-शिंपले भरपूर सापडतात. मिहिर सेन या भारतीय जलतरणपटूने ६ एप्रिल १९६६ रोजी पाल्क सामुद्रधुनी पोहत पार करण्याचा पहिला साहसी विक्र म केला.

दक्षिण अटलांटिक महासागर व दक्षिण पॅसिफिक महासागर यांना जोडणाऱ्या ५५० किमी. लांबीच्या सागरी प्रदेशास (विभागास) मॅगेलन सामुद्रधुनी असे म्हणतात. ही सामुद्रधुनी पार करण्यास ⇨फर्डिनंड मॅगेलन व त्याच्या साथीदारांना सु. ३८ दिवस लागले. या सामुद्रधुनीतून प्रवास करणारा मॅगेलन हा पहिलाच यूरोपियन होय. त्याच्या नावावरुन तिला ‘मॅगेलनची सामुद्रधुनी’ म्हणतात. या काही प्रमुख सामुद्रधुनींव्यतिरिक्त अन्य काही लहान आकाराच्या अनेक सामुद्रधुनी आढळतात.

कुंभारगावकर, य. रा.