ब्लँटायर : (ब्लँटायर-लिम्बे). मालावी प्रजासत्ताकातील एक प्रमुख शहर. लोकसंख्या २,२२,२०० (१९७७). हे झाँबाच्या नैऋत्येस ६० किमी. ‘शिरे हायलँड्स’ भागात एम्‌चिरू पर्वतपायथ्याशी वसलेले आहे. व्यापार, उद्योगधंदे व दळणवळणाचे हे केंद्र असून, चीलेका विमानतळ येथून १९ किमी. अंतरावर आहे.

स्कॉटलंड मिशनच्या चर्चचे एक केंद्र म्हणून १८७६ मध्ये हे वसविण्यात आले. स्कॉटिश मिशनरी व आफ्रिका खंडाचा एक संशोधक ⇨ डेव्हिड लिव्हिंग्स्टन याच्या स्कॉटलंडमधील जन्मगावाच्या नावावरून यास ब्लँटायर हे नाव देण्यात आले. १८८३ मध्ये ब्रिटिश कौन्सिलरचे एक ठिकाण म्हणून हे प्रसिद्ध होते. हस्तिदंताच्या व्यापारामुळे याची उत्तरोत्तर प्रगती होऊन एक औद्योगिक व व्यापार केंद्र म्हणून त्यास महत्त्व प्राप्त झाले. येथे अन्नप्रक्रिया, सिमेंट, रसायने, कापड, तंबाखू, शीत पेये इत्यादींचे उद्योगधंदे विकसित झाले आहेत. १९५६ मध्ये नजीकचे लिम्बे शहर त्यात विलीन करण्यात आले.

येथे अँग्लिकन व रोमन कॅथलिक कॅथीडूल तसेच मालावी विद्यापीठ (स्थापना १९६५) आहे. शहराच्या आग्नेयीस असलेला एम्‌लांजे पर्वत, परिसरातील चहाच्या लागवडीमुळे पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.

गाडे, ना. स.