क्षिप्रा : भारताच्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतून वाहणारी चंबळ नदीची एक उपनदी. लांबी सु. २४० किमी. हिचा प्रवाह द्रुतगती असल्यामुळे तीला क्षिप्रा (जलद वाहणारी) म्हणतात. अवंती व उज्जैनची नदी या नावानेही ही ओळखली जाते. हिंदूंची ही एक पवित्र नदी असून प्राचीन साहित्यात तिला सिप्रा किंवा शिप्रा, तर पुराणांत ज्वरघ्नी, पापघ्नी व अमृतसंभवा अशी नावे आहेत. स्कंद पुराणातील अवंतीखंडात हिचे माहात्म्य वर्णिले आहे. मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहराच्या आग्नेयीस सु. १९ किमी. अंतरावर, विंध्य पर्वताच्या उत्तर भागातील कोक्रीबर्डी टेकडीत क्षिप्रा नदीचा उगम झाला असून माळव्यात तीला सपराजी म्हणतात. उगमानंतर नागमोडी वळणे घेत ती सामान्य-पणे वायव्येस वाहत जाते. क्षिप्रा नदीच्या काठावर अनेक पवित्र व धार्मिक स्थळे असून त्या स्थळांशी निगडित अनेक धार्मिक आख्यायिका आहेत. त्यांपैकी उज्जैन हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून नदीकाठी अनेक घाट बांधले आहेत. या एकसंध घाटांमुळे येथे प्रवाहमार्गाला धनुष्याकार प्राप्त झाला आहे. उज्जैन येथील नदीच्या काठावर अनेक मंदिरे, ऋषींचे आश्रम व इतर धार्मिक वास्तू असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीमहांकालेश्‍वराचे मंदिर येथे आहे. शहरापासून काही अंतरावर नदीच्या पात्रात कालिया डोह हा एक मोठा डोह आहे. या डोहाच्या पुढे क्षिप्रेचा प्रवाह दुभंग होऊन त्यांदरम्यान एक लहानसे बेट निर्माण झाले आहे. बेटाच्या पुढे हे दोन्ही प्रवाह पुन्हा एकत्र येतात. या बेटावर पूर्वी सूर्य-नारायणाचे मंदिर होते. ते माळव्याचा सुलतान नासिरुद्दीन खलजी याने पाडून तेथे कालिया डोह महल बांधला. उज्जैन येथे अनेक उत्सव होतात. त्यांपैकी दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वणीला येथे फार मोठा कुंभमेळा भरतो. उज्जैननंतर पुढे उत्तरेस राजस्थानमध्ये वाहत जाऊन ही नदी राजस्थानमधील झालवाड या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशास जेथे मिळते, तेथे बरखेडा गावाच्या ईशान्येस उजवीकडून चंबळ नदीला मिळते.

पूर्वी नदीला भरपूर पाणी असे परंतु उद्योगधंदे व शेती यांसाठी तिच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यामुळे आता पावसाळ्यानंतर नदीला अत्यल्प पाणी असते. तसेच नदीच्या काठावरील उद्योगांमधील दूषित द्रव्ये तसेच खेडी, शहरे यांमधील वाहते मलमूत्र नदीत सोडल्यामुळे तिच्या पाण्याचे प्रदूषण बरेच वाढले आहे. खान व गंभीर या क्षिप्राच्या उपनद्या आहेत. क्षिप्रा व खान यांच्या संगम स्थानाला त्रिवेणी संगमाचे स्थान म्हणून महत्त्व आहे. क्षिप्रा नदी नर्मदा नदीला जोडण्याची योजना असून त्यामुळे क्षिप्रा नदीला सलग पाणीपुरवठा होईल.

चौधरी, वसंत