कोहाट: पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या कँटोन्मेंटसह ४९,८५४ (१९६१). हे पेशावर-बन्नू सडकेवर पेशावरच्या दक्षिणेस ५९ किमी., कोहाट नदीकाठी व कोहाट खिंडीजवळ असून रावळपिंडी-कराची लोहमार्गावरील झंड प्रस्थानकापासून पश्चिमेकडे फुटलेल्या रेल्वेफाट्याने, ६४ किमी. वर आहे. तिन्ही बाजूंनी टेकड्या व चौथ्या बाजूस भक्कम तट असलेले हे शहर मोगलांचे व शिखांचे महत्त्वाचे ठाणे होते. कोहाट परिसरात आफ्रिडी व आदम खेल टोळीवाले राहतात. त्यांच्यावर आणि वायव्य सरहद्द प्रांतातील टोळीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी व आता पाकिस्तानने कोहाट हे केंद्र ठेवले आहे. गहू, कडधान्ये, मका, कापड, मीठ इत्यादींची ही बाजारपेठ आहे.        

                           ओक, द. ह.