मिडवे बेटे : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अखत्यारीतील मध्य पॅसिफिक महासागरातील बेटे. यांमध्ये सँड व ईस्टर्न (ग्रीन) ही दोन प्रमुख बेटे आहेत. ही बेटे हवाई द्वीपसमूहाच्या पश्चिमेस, होनोलूलूच्या वायव्येस सु. २,१०० किमी. (२८° १३ उ. अक्षांश व १७७° २१ प. रेखांशावर) वसलेली आहेत. लोकसंख्या ४५३ (१९८०).

अमेरिकन कॅ. एन्‌. सी. ब्रुक्स याने १८५९ मध्ये या बेटांचा प्रथम शोध लावला. १८६७ मध्ये अमेरिकेने ती ताब्यात घेतल्यावर त्यांस ‘मिडवे’ हे नाव देण्यात आले. १९०३ मध्ये ही बेटे अमेरिकने नौसेनेच्या अखत्यारीत आली. १८०५ मध्ये सँ ड बेटावर हवाई-लूझॉन दरम्यान सागरांतर्गत संदेशवाहनाचे केंद्र उभारण्यात आले. ट्रान्स-पॅसिफिक हवाई वाहतुकीमुळे १९३६ मध्ये व्यापारी दृष्ट्या तसेच सॅन फ्रॅन्सिस्को-मानिला (फिलिपीन्स) यांदरम्यानच्या वाहतुकीचे प्रमुख थांब्याचे ठिकाण म्हणून यास महत्त्व प्राप्त झाले. १९४१ मध्ये अमेरिकेने आपले नाविक व हवाई तळ येथे उभारले. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका व मित्र राष्ट्रे यांनी ३ जून १९४२ रोजी येथील युद्धात जपानवर निर्णायक विजय मिळविला त्यामुळे पॅसिफिक महासागरी युद्धास कलाटणी मिळाली. युद्धोत्तर काळात याचे व्यापारी वाहतुकीतील महत्त्व कमी होऊन फक्त लष्करी दृष्ट्या यास महत्त्व उरले आहे.

मिडवे बेटांवर उभारण्यात आलेले हवामान सेवाकेंद्र जागतिक वातावरविज्ञान संघटनेकरिता वेधशाळेचेही कार्य करते. येथील पक्षीजीवनाचे (लायसॉन ॲल्बट्रॉस, फ्रिगेट पक्षी, कुररी, बोसन इ.) संरक्षण-संवर्धन करण्याच्या हेतूने येथे राष्ट्रीय वन्यजीव आरक्षण क्षेत्र स्थापण्यात आलेले आहे.

गाडे, ना. स.