वागाडूगू: पश्चिम आफ्रिकेतील बर्किना फासो (अपर व्होल्टा) देशाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ४,४२,२२३ (१९८५). देशाच्या मध्यवर्ती भागात तांबडी व श्वेत व्होल्टा या नद्यांदरम्यान हे शहर वसलेले आहे. पंधराव्या शतकात मोसी साम्राज्याची व मोरो नाबा (महान स्वामी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोसी राजाची  ही राजधानी होती. हे राजे मुस्लिम धर्मीय होते. काही जुन्या वसाहती मिळून या नगराची निर्मिती झाली असली, तरी नागरी विस्तार प्रामुख्याने फ्रेंच सत्ता आल्यानंतरच (इ. स. १८९६) झाला. १९५२ मध्ये प्रांतिक राजधानी होईपर्यंत त्याचा विकास मंदगतीनेच होत होता. स्वातंत्र्योत्तर काळातच (१९६० नंतर) त्याचा विकास अधिक वेगाने झाला. त्याच सुमारास येथील मोसी राजांची सत्ता कमी झाली.  

वागाडूगू हे देशातील प्रशासन, वाहतूक, संदेशवहन, व्यापार व आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. आसमंतातील कृषी  उत्पादनांवरील प्रक्रिया, पेयनिर्मिती, कापड, आगपेट्या, पादत्राणे, हस्तव्यवसाय, यांपुरतेच शहरातील उद्योगधंदे मर्यादित आहेत. कृषी उत्पादनांचा व्यापार व वितरण येथे चालते. अटलांटिक किनाऱ्यावरील आबीजान (आयव्हरी कोस्ट) शहराशी लोहमार्गाने आणि न्यामे (नायजर) शहराशी हे रस्त्याने जोडलेले असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरात मोठी वनराई तसेच आधुनिक सार्वजनिक इमारती, देशातील पहिले वागाडूगू विद्यापीठ (स्था. १९६९) आणि राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय आहे.  

मगर, जयकुमार चौधरी, वसंत