बोफर्ट, फ्रान्सिस : (? १७७४ – ? १८५७). ख्यातनाम ब्रिटिश नाविक अधिकारी व वातावरणविज्ञ. याने पृष्ठभागीय वाऱ्यांच्या वेगाची अवलंबनीय कल्पना देणारे कोष्टक किंवा मापप्रमाण (बोफर्ट विंड स्केल) तयार केले त्याचप्रमाणे हवामानाच्या विविध आविष्कारांवरुन त्यांचे वर्गीकरण व संकेतन (वेदर नोटेशन) सुचविले.

वयाच्या तेराव्या वर्षी फ्रान्सिस केबिन-बॉय म्हणून ब्रिटीश नौदलात शिरला. स्वकर्तृत्वावर तो उच्च पदांवर जाऊन पोहोचला. १८०५ मध्ये ‘वूलविच’ या लढाऊ जहाजाचा तो मुख्य नियंत्रक झाला. १८०९-१२ यांदरम्यान बोफर्टने भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील भागाचे सर्वेक्षण केले १८१४ मध्ये ‘रॉयल सोसायटी ऑफ लंडन फॉर द इंप्रूव्हमेंट ऑफ नॅचरल नॉलेज’ (स्था. १६६०) या संस्थेने बोफर्टला सदस्यत्व बहाल केले. लवकरच त्याला ‘सर’ हा किताबही मिळाला. ब्रिटिश नौदलाचा जलालेखक म्हणून बोफर्टने सागरमापनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले (१८२९-५५). १७९० पासून बोफर्टने हवामानाची दैनंदिनी (वेदर डायरी अँड मीटिअरॉलॉजिकल जर्नल) लिहिण्यास प्रारंभ केला. हवामानीय आविष्कारांशी पृष्ठभागीय वाऱ्यांच्या वेगांचे अतूट नाते असल्याचे तसेच पृष्ठभागीय वाऱ्यांच्या वेगांचे अभिसीमादर्शक तेरा श्रेणींचे कोष्टक तयार करणे शक्य असल्याचे त्याने १८०७ मध्ये सिद्ध केले. १८३८ पासून ब्रिटिश नौदलाने आपल्या सर्व जहाजांवर वातावरण-वैज्ञानिक उपकरणे बसवून दिवसाच्या ठराविक वेळी हवामानाचे निरीक्षण करण्याचा पायंडा पाडला. १८७४ मध्ये पहिल्या ‘वातावरण वैज्ञानिक परिषदे’त ‘बोफर्ट पवनवेग निदर्शक कोष्टका’ला मान्यता मिळाली. वातावरण-वैज्ञानिक निरीक्षणांच्या सांकेतिक संदेशात आणि हवामानपरिस्थितीनिदर्शक नकाशात वाऱ्याचा वेग बोफर्ट विंड स्केल प्रमाणे दाखविला जातो.

बोफर्ट हवामान संकेतनाला १९२१ च्या ‘आंतरराष्ट्रीय वातावरण-वैज्ञानिक समिती’ने किरकोळ फेरफारांसह मान्यता दिली. दुसऱ्या महायुध्दोत्तर कालखंडात नाविक व हवाई वाहतूक वाढली व पूर्वीचे हवामानाचे वर्गीकरण व संकेतन अपुरे ठरुन त्यांत पुढे अनेक बदल करावे लागले. सांकेतिक अक्षरांची जागा सांकेतिक चिन्हांनी घेतली. तथापि त्यांचा मूलभूत आधार बोफर्टच्या संकल्पना हाच मानला जातो.

संदर्भ : Ashley, Barnard, Weathermen, London, 1974.

चोरघडे, शं. ल.