अलेप्पी : केरळ राज्यातील अलेप्पी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,६०,०६४ (१९७१). कोचीनच्या दक्षिणेस ५४ किमी. आणि क्विलॉनपासून उत्तरेस ७८ किमी. अंतरावरील हे बंदर, पश्चिमेकडे अरबी समुद्र व पूर्वेकडे त्या समुद्राचाच फाटा आत शिरून बनलेल्या ‘वेंबनाड’सरोवराच्या मध्ये आलेल्या भूशिरावर वसलेले आहे. १६ किमी. उत्तरेस पोरकड बंदरी असलेल्या डच वखारीस शह म्हणून १८ व्या शतकात अलेप्पीची स्थापना केली गेली. कालव्याने शहर त्रावणकोरशी जोडलेले असून ते सडकांनी इतर प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. नारळ, काथ्या, खोबरे, चटया व मसाल्याचे काही पदार्थ यांचा येथे उद्योग व व्यापार आहे. शहरात कालव्यांचे जाळे असल्याने यास ‘केरळचे व्हेनिस’म्हणतात.

ओक, शा. नि.