ब्लू पर्वत : (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पर्वतरांग. ही पर्वतरांग ऑरेगन राज्याच्या मध्यापासून ईशान्येस वॉशिंग्टन राज्यापर्यंत पसरलेली आहे. सुमारे ३१० किमी. लांब व ११० किमी. रुंदीच्या या पर्वतरांगेची सरासरी उंची २,००० मी. पर्यंत आढळते. या पर्वतरांगेत ऑल्ड्रिच, स्ट्रॉबेरी, एल्कहॉर्न इ. शिखरे असून रॉक क्रीक ब्यूट (२,७७५ मी.) हे येथील सर्वोच्च शिकर होय. या पर्वताच्या उतारावर डग्लस फर, पाइन इ. वनस्पतिविशेष आढळतात. डेश्यूट, जॉनडे, ग्रँड राँड या कोलंबिया नदीच्या उपनद्या या भागातून वाहतात. या परिसरातील कमी उंचाच्या व पठारी भागांत जलसिंचनाद्वारे शेती केली जाते. त्याशिवाय खाणकाम, जंगल उत्पादन व्यवसायही चालतात. या पर्वतरांगेच्या परिसरातील यूमाटिला, व्हिटमन, मलुर ही राष्ट्रीय वने पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.

(२) जमेकामधील ही पर्वतरांग किंग्स्टनच्या उत्तरेस सु. १३ किमी. वर पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. या पर्वतरांगेची लांबी ५० किमी. असून सर्वसाधारण उंची २१४ मी. ते १,२१९ मी. यांदरम्यान आढळते. या रांगेत ‘ब्लू मौंटन’(२,२५६ मी.) हे सर्वोच्च शिखर असून पाच खिंडी आहेत. घनदाट अरण्यांनी व्यापलेल्या या पर्वतरांगेत हिवाळ्यातील तपमान ७ सें.पर्यंत उतरते. पर्वत उतारावरील भागात कॉफीची लागवड केली जाते. रमणीय निसर्गसौंदर्यामुळे न्यूकॅसल व मँडिव्हिल या ठिकाणी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते.

(३) ऑस्ट्रेलियातील ग्रेट डिव्हायडिंग रेंजच्या न्यू साउथ वेल्समधील विच्छिन्न, वालुकाश्म पठारी भाग ‘ब्लू पर्वत’ अथवा ‘ब्लू प्लॅटो’ म्हणून ओळखला जातो. याच्या पूर्व भागातील ३७० ते ५५० मी. उंचीच्या  तुटलेल्या कड्यापासून पश्चिमेकडील ‘बर्ड रॉक’ या सुळक्यापर्यंत सु. १,१३४ मी. पर्यंत उंची वाढत जाते. पर्वताचे उतार सुळ्यासारखे  उभे असून पर्वतरांग १८१३ मध्ये ग्रेगोरी ब्लॅक्सलँड या समन्वेषकाने प्रथम पार केली. या पर्वतरांगेतून बांधण्यात आलेले रस्ते व लोहमार्ग यांच्या सुविधांमुळे दळणवळण सुलभ झाले असून, सिडनी ते लिथगो यांमधील लोहमार्गांवर अनेक शहरे भरभराटीस आलेली आहेत. या पर्वतरांगेतील जनोलन गुहा व ग्रोस नदीखोऱ्यातील राष्ट्रीय उपवन उल्लेखनीय आहे.

 लिमये, दि. ह. सावंत, प्र. रा.