सरस्वतीनदीसरस्वती या नावाच्या अनेक नदया भारतात आढळतात. तथापि प्राचीन काळची मानलेली सरस्वती नदी मात्र लुप्त झालेली आहे. वैदिक वाङ्मय, रामायण, महाभारत, मनुस्मृति, पुराणे आणि अभिजात संस्कृत वाङ्मय यांतून सरस्वतीचा उल्लेख नदी या अर्थाने आढळतो. ऋग्वेदा त सरस्वती या नावाची तीन स्वतंत्र सूक्ते (ऋग्वेद – ६·६१, ७·९५ व ७·९६) आहेत. भारतात सरस्वती याच नावाच्या सु. ३२ नदया आढळतात. त्यांपैकी भारताच्या वायव्य भागातील सरस्वती नदी ‘हरद्वती’ या नावाने ओळखली जाते. कोलकात्त्याजवळच्या एका प्रवाहासही सरस्वती म्हणतात. गुजरातमध्ये अबूपासून खंबायतच्या आखातात जाणारी नदीही सरस्वतीच होय. तिला गुर्जर सरस्वती म्हणतात. राजस्थानात सरस्वती नावाचे दोन प्रवाह आहेत. त्यामुळे मूळ सरस्वती नदी कोणती, याविषयी तज्ज्ञांत मतभिन्नता आढळते.

वैदिक आर्यांनी सप्तसिंधू प्रदेशात म्हणजे पंजाबात प्रथम वसाहत केली. त्याकाळी त्या प्रदेशातून वाहणाऱ्या नदयांमधील सरस्वती ही श्रेष्ठ नदी होती. ऋग्वेदा त उल्लेखिलेल्या सरस्वती नदीचा उगम, प्रवाह-मार्ग, सागरमुख इ.बाबत पाश्चात्त्य आणि भारतीय संशोधकांनी संशोधन व चर्चा केलेली आहे. डॉ. एम्. एस्. कृष्णन् या भूवैज्ञानिकाने जिऑलॉजी ऑफ इंडिया अँड बर्मा (१९६८) या पुस्तकात सरस्वती नदीच्या प्रवाहमार्गाचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते हरयाणा राज्यातील अंबाला जिल्ह्याच्या सीमेवरील सिरमूर टेकडया व शिवालिक पर्वतश्रेणीत सरस्वतीचा उगम झाला असावा. पुढे ती आदी बद्री येथे समतलभूमीवर वाहते आणि भवानीपूर व बाल छप्परनंतर वळून नाहीशी (लुप्त) होते परंतु ती थोडया अंतरावर कर्नालच्या वायव्येस बरखेडे जवळ प्रकट होते. याच परिसरात घग्गर (प्राचीन दृशद्वती) नदी तिला मिळते. पतियाळा जिल्ह्यांतून सु. १७५ किमी. च्या प्रवासानंतरचा त्यांचा संयुक्त प्रवाह हाकारा (हाका) किंवा सोतार या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी तिचे पात्र विशाल असून त्यामुळे प्राचीन काळी ही फार मोठी नदी असली पाहिजे, हे लक्षात येते. पुढे ती हनुमानगढजवळ (बिकानेर जिल्हा) वाळवंटात लुप्त होते तत्पूर्वी तिला या परिसरात पूर्वेकडून चित्रांग ही नदी येऊन मिळते. तिचे पात्र जवळजवळ शुष्क आहे.

भूगर्भातील लुप्त सरस्वतीच्या संशोधनात उपगहाव्दारे काही मौलिक माहिती उपलब्ध झाली असून छायाचित्रेही मिळाली आहेत. ह्या माहितीच्या आधारे तज्ज्ञांनी काही निष्कर्ष काढले. त्यांच्या मते सरस्वती ही सध्याच्या राजस्थानातील नदी असून राजस्थानची भूमी फार वर्षांपूर्वी वनश्रीने नटलेली होती. आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी सरस्वती आपल्या जलस्रोताने विस्तीर्ण प्रदेशास पाणी पुरवठा करीत असावी पण किमान चार वेळा तिने आपला प्रवाह-मार्ग बदलला. तसेच वेधन यंत्राव्दारे मिळविलेल्या पाण्याचे भाभा अणु संशोधन केंद्रात पृथक्करण करून समस्थानिके (आयसोटोप्स) वेगळी करण्यात आली. कार्बन चौदा चाचणीनुसार या पाण्याचे वय सु. आठ हजार वर्षे निश्चित झाले. या सर्व प्रयत्नांतून एक गोष्ट निश्चित झाली की, चार हजार वर्षांपूर्वी एक विशाल नदी (सरस्वती) स्वतःचे पात्र बदलत राजस्थान, उत्तर सिंध प्रांत व दक्षिण सिंध प्रांत किंवा कच्छच्या रणातून पश्चिम समुद्राला (अरबी समुद्राला) निरनिराळ्या मुखांनी मिळाली असावी. प्राचीन काळी तिची लांबी १,७०० किमी. असावी.

संदर्भ : १. देशपांडे, सु.र.सरस्वती-दर्शन,पुणे, २००२.

             २. भालेराव, शं.म.भारतीयसरिताकोश, खंड,पुणे, २००८.

देशपांडे, सु.