ब्रूझ : बेल्जियममधील पश्चिम फ्लॅडर्स प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,१८,२१२ (१९८१ अंदाज). हे ब्रूसेल्सच्या वायव्येस ८९ किमी. वर वसलेले असून व्यापार, उद्योगधंदा व पर्यटन यांचे हे केंद्रस्थान आहे. कालव्याद्वारे झेब्रख या उत्तर समुद्रावरील बंदराशी ते जोडलेले आहे. शहरात व भोवती कालव्यांचे जाळे असून कालव्यांवर येथे ५४ पूल आहेत. त्यामुळे त्यास ‘पुलांचे शहर’ म्हटले जाते.

तागाचे व भरजरी कापड, दळणवळण साहित्य, लोकर, लेसनिर्मिती, दागदागिने, रेल्वेचे साहित्य, मद्ये, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रसायने, जहाजबांधणी इ. उद्योग येथे विकसित झालेले आहेत. येथे पारंपारिक हस्तव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात. येथून मध, तेल, कच्चा माल इत्यादींची आयात, तर कृषिपदार्थ, पक्का माल इत्यादींची निर्यात होते.

उत्तर समुद्राच्या खाडीवर इ. स. नवव्या शतकात ब्रूझ फ्लँडर्सचे मुख्य ठिकाण बनले. अकराव्या शतकात इंग्लंडबरोबरच्या व्यापाराचे हे केंद्र होते, तर तेराव्या हॅन्सिॲटिक लीगचे प्रमुख बंदर व फ्लँडर्सचे प्रमुख लोकर प्रक्रिया केंद्र म्हणून त्याचा विकास घडून आला. चौदाव्या शतकात उत्तर यूरोपीय व्यापाराची उतारपेठ म्हणून यास महत्त्व होते. राजकीय दृष्ट्याही लोकर उद्योगातील व्यापारी संघटनांचा या शहरावर प्रभाव होता. फ्रान्सचा चौथा फिलिप याने १३०१ मध्ये फ्लँडर्सचा ताबा घेतला, त्यावेळी फ्रेंच आक्रमणाला प्रतिकार करण्यात हे शहर अग्रेसर होते. येथील नागरी सैन्याने फ्रेंचांचा पराभव केला होता (बॅटल ऑफ स्पर्स, १३०२). राजकीय सत्तास्पर्धेतूनही लोकरउद्योग व व्यापार यांमुळे पंधराव्या शतकापर्यंत याची सतत भरभराट होत गेली. नंतर मात्र लोकर व्यापारातील स्पर्धा वाढली. गाळ साठल्यामुळे खाडीचा मार्गही बंद होऊन (१४५०) याचे महत्त्व कमी झाले. १७९४ मध्ये हे फ्रेंचांच्या, तर १८१४ – ३० पर्यंत हे डचांच्या ताब्यात होते. १८९५ नंतर बंदाराची दुरुस्ती करण्यात आली व झेब्रख बंदरापर्यंत कालवा काढण्यात आला (१९०७). त्यामुळे शहराचे व्यापारी महत्त्व वाढीस लागले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत हे जर्मनांच्या ताब्यात होते.

फ्लँडर्सच्या ड्यूकच्या कारकीर्दीत फ्लेमिश कलांचे हे माहेरघर होते. यान व्हान आयिक (सु. १३९० – १४४१), गेरार्ट डाव्हिट (१४५० – १५२३) यांसारख्या श्रेष्ठ कलावंतांच्या चित्रशिल्पांनी येथील चर्चवास्तू, सार्वजनिक इमारती, वस्तुसंग्रहालये नटलेली आहेत. सेंट जॉन रुग्णालयातील (बारावे शतक) हान्स मेमलिंगच्या (१४३० ?-९५) कलाकृती, व्यापारभवन, कापड गिरणी कामगारांचे सभागृह (तेरावे शतक) व त्यातील ४८ घंटांचा मनोरा (तेरावे-पंधरावे शतक), नगरभवन (चौदावे शतक), नोत्रदाम चर्च आणि त्यातील चार्ल्‌स द बोल्ड व मेरी बर्गंडीची कबर तसेच मायकेल अँजेलोचे ‘व्हर्जिन अँड चाइल्ड’ हे भित्तिचित्र, सेंट सोव्हर कॅथीड्रल (दहावे शतक). चॅपेल ऑफ द प्रेशस ब्लड (बारावे शतक) इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत.

गाडे, ना.स.