माधवनगर : महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यातील, सांगली नागरी विभागातील औद्योगिक नगर. लोकसंख्या ११,१४४ (१९८१). हे मिरज तालुक्यात सांगलीच्या ईशान्येला सु. ५ किमी. व मिरजेच्या वायव्येस २० किमी. अंतरावर वसलेले असून दक्षिण-मध्य लोहमार्गावरील एक स्थानक आहे. सांगलीशी ते पक्क्या सडकेने जोडलेले आहे. 

सांगली संस्थानाच्या पटवर्धन घराण्यातील माधवराव पटवर्धन यांनी १९३५ मध्ये बुधगावजवळच एक छोटे गाव वसविले. त्यांच्या नावावरूनच त्या गावाला ‘माधवनगर’ हे नाव देण्यात आले. पूर्वी खेडेवजा असलेले हे गाव आता लघुउद्योगांमुळे विकसित होत असून येथे कापडगिरण्या, यंत्रमाग, हातमाग इ. महत्त्वाचे लघुउद्योग आहेत. द. महाराष्ट्रात पूर्वीपासून प्रसिद्धी पावलेली ‘माधवनगर कॉटन मिल’ ही येथील सूत व कापडगिरणी आजही विख्यात आहे. याशिवाय येथे शेतकरी सहकारी साखर कारखाना तसेच तेलगिरण्याही आहेत. येथे एक प्राथमिक, माध्यमिक शाळा व शांतिनिकेतन महाविद्यालय असून एक वाचनालयही आहे. फाल्गुन वद्य तृतीयेला येथे शिवजयंतीचा मोठा उत्सव साजरा करतात.

खंडकर, प्रेमलता