सेंदाई : (सेंडाई). जपानच्या होन्शू बेटावरील मीयागी प्रांताची राजधानी व एक प्रमुख शहर. लोकसंख्या १०,४६,६५४ (२०११). होन्शू बेटाच्या ईशान्य भागात नानाकिता व हीरोसे या नद्यांदरम्यान हे शहर, सेंदाई उपसागर किनाऱ्यापासून पश्चिमेस अंतर्गत भागात सु. १३ किमी.वर वसले आहे. सभोवतालच्या वनाच्छादित प्रदेशामुळे अनेकदा या शहराचा ‘फॉरेस्ट कॅपिटल’ असा उल्लेख केला जातो. येथे ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक (२४ ° से.) तर फेब्रुवारीमध्ये सर्वांत कमी (-१° से.) तापमान असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११४ सेंमी. असते.

सतराव्या शतकातील दाइम्यो सरंजामदारांनी आपल्या राजधानीचे ठिकाण म्हणून वास्तुशास्त्रीय दृष्ट्या या नगराची रचना केली. दुसऱ्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांनी या शहरावर बाँबहल्ले करून ह्याचा विध्वंस केला होता. त्यानंतर संपूर्ण शहराची पुनर्रचना करण्यात आली. सांप्रत हे प्रमुख धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक केंद्र आहे. शहरात रेशीम, लाकडी वस्तू, खाद्यपदार्थ, रसायने, रबर, यंत्रे व पोलाद निर्मिती, इतर धातू उत्पादने व छपाई हे उद्योग चालतात. लोहमार्ग वाहतुकीचे हे प्रमुख केंद्र आहे परंतु ते किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असल्यामुळे जलवाहतुकीसाठी ईशान्येस २४ किमी. सेंदाई उपसागर किनाऱ्यावर असलेल्या शीओगामा बंदरावर अवलंबून रहावे लागते. येथे तोहोकू विद्यापीठ (१९०७), वस्तुसंग्रहालये व एक वेधशाळा आहे.

शहराच्या पश्चिमेस आओबा टेकडीवर सोळाव्या शतकातील सेंदाई (आओबा) किल्ल्याचे भग्नावशेष आढळतात. येथील ओसाकी हाचीमां द्दशिंतो स्तूप वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. दरवर्षी येथे होणाऱ्या ‘तानाबाता (स्टार) फेस्टिवल ’ या महोत्सवासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

चौधरी, वसंत