बॅस, जॉर्ज : (१७६० ? – १८१२ ?). ब्रिटिश दर्यावर्दी व बॅस सामुद्रधुनीचा संशोधक. इंग्‍लंडच्या लिंकन परगण्यातील अस्वार्बी येथे जन्म. याच्या जन्मवर्षाविषयी अनिश्चितता आहे. त्याने काही दिवस बॉस्टनमधील (इंग्लंड ) एका शल्यचिकित्सकाकडे उमेदवारी केली. १७८९ मध्ये त्याने शाही नौदलामध्ये प्रवेश केला. १७९४ मध्ये ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या ‘रिलायन्स’ या लढाऊ जहाजावर त्याची शल्यचिकित्सक म्हणून नेमणूक झाली. याच सफरीत मॅथ्यू फ्लिंडर्सबरोबर त्याचा परिचय झाला. दोघांनी मिळून १७९५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय किनाऱ्याचे समन्वेषण केले. १७९८-९९ यांदरम्यान १९,३०० किमी. प्रवास करून टास्मानियाला वळसा घातला व ते स्वतंत्र बेट असल्याचे निदर्शनास आणून दिले. या महत्त्वाच्या संशोधनामुळेच टास्मानिया आणि ऑस्ट्रेलिया यांमधील सामुद्रधनी ‘बॅस सामुद्रधनी’ या नावाने ओळखली जाते. पुढे त्याने ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात जाण्याचा प्रयत्‍न केला परंतु ब्‍लू मौंटन ओलांडणे त्याला शक्य झाले नाही. या सफरीमध्ये त्याने या प्रदेशातील प्राणी व वनस्पतिजीवनाचा अभ्यास केला. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे १७९९ मध्ये तो इंग्‍लंडला परतला. १८०० मध्ये जॉर्ज पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या मोहिमेवर गेला. १८०३ मध्ये तो ऑस्ट्रेलियाहून द. अमेरिकेतील चिलीकडे निघाला. या मोहिमेत पॅसिफिक महासागरातील स्पॅनिश वसाहतींमधून प्रवास करताना त्याला स्पॅनिशांनी पकडले असावे. तो दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश वसाहतीतच मरण पावला, असा समज आहे.

शाह, र. रू.