अन्नमलई : सह्याद्रीचा दक्षिणेकडील फाटा. पालघाट खिंडीनंतर सह्याद्रीची एक रांग दक्षिणेकडे सुरू होते. तिलाच ‘दक्षिणघाट’ म्हणतात. या दक्षिणघाटाच्या अनाईमुडी शिखरापासून ईशान्येला पलनी, दक्षिणेला एलामई ऊर्फ कार्डंमम व उत्तरेला अन्नमलई नावाच्या पर्वतश्रेणी पसरल्या आहेत. अन्नमलई पर्वतश्रेणी तमिळनाडूतील कोईमतूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे व केरळच्या पालघाट, त्रिचूर व एर्नाकुलम् जिल्ह्यांच्या पूर्वेस असून उ. अक्षांश १०°१५’ ते १०°३१’ व पू. रेखांश ७६°५१’ ते ७७° २०’ या दरम्यान पसरलेली आहे. अन्नमलई–अनाइमलई–म्हणजे ‘हत्तींचा डोंगर’. हा नाइस खडकांचा बनलेला असून येथे फेल्स्पार व स्फटिक आढळतात. अतिउंच पर्वतराजीचे पठार सरासरी २,१३३ मी. उंच असून त्यावर अनाईमुडी (२,६९५मी.), अक्का व तंगची ही शिखरे आहेत. हे पठार उंचसखल असून तुटलेल्या कड्यांनी व घनदाट जंगलांनी व्याप्त आहे. येथील हवा निलगिरीप्रमाणेच असून दऱ्‍यातील सृष्टिशोभा अतिशय नयनमनोहर आहे. उत्तम प्रतीचे सागवानी लाकूड येथे मिळते. हत्तींच्या साहाय्याने व नदी-नाल्यांतून हे लाकूड सखल भागात आणण्यात येते. येथील अरण्यात रानहेला, सांबर, वाघ, चित्ता, अस्वल, हत्ती इ. वन्यप्राणी आढळतात. मुथुवन, पुलयन, काडन व मलसर या आदिवासी जमाती येथे राहतात. अन्नमलईच्या कमी उंचीच्या –सु. ९००–१,३००मी. – प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉफीचे मळे आहेत.

जोशी, चंद्रहास