हालापा : (हालापा एन्रीकस ). मेक्सिकोतील व्हेराक्रूझ राज्याच्या राजधानीचे शहर. हे व्हेराक्रूझच्या वायव्येस ९० किमी. सिएरा-माद्रे ओरिएंटल पर्वतउतारावर सस.पासून १,४२७ मी. उंचीवर वसलेले आहे. लोकसंख्या ४,२४,७५५ (२०१०). हे राज्यातील प्रसिद्ध आरोग्यधाम व उद्योग-व्यापाराचे केंद्र आहे.

 

हालापा हे लोहमार्गाचे प्रस्थानक असून इतर मोठमोठ्या शहरांशी रस्त्यांनीही जोडलेले आहे. याच्या परिसरात हालाप ही औषधी वनस्पती आढळत असल्याने याचे हालापा असे नामकरण झाले असावे, असे मानतात.

 

स्पॅनिश वसाहतकार एर्नांदो कोर्तेझ येथे येण्यापूर्वी हे अमेरिकनइंडियनांचे खेडे होते. स्पॅनिशांच्या आगमनानंतर याचा विकास झाला. १७२० पासून त्यास व्यापारी महत्त्व प्राप्त झाले. एकोणिसाव्या शतका-तील गव्हर्नर जुआन डे ला लूज एन्रीकस याच्या सन्मानार्थ शहरासहालापा एन्रीकस असेे नाव देण्यात आले. ९ मे १८२४ मध्ये ला डॉन ग्वॉदलूप व्हिक्टोरिया या राष्ट्राध्यक्षाच्या हुकूमनाम्याने व्हेराक्रूझ राज्याच्या विधानमंडळाची येथे स्थापना करण्यात आली व याच वर्षापासून राज्याची राजधानी येथे स्थापण्यात आली. वसाहतकाळात स्पेनमधील कादिझ येथून आणलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी भरविण्यात येणाऱ्या वार्षिक महोत्सवासाठी हे शहर प्रसिद्ध होते.

 

मेक्सिकोच्या अर्थव्यवस्थेत हालापा येथील ‘फुलांचे’ फार मोठे योगदान आहे. येथील पोषक हवामानामुळे राज्यातील कॉफी वतंबाखू उत्पादनात हालापा अग्रेसर आहे. येथे सिगारेटी बनविणे, फळ-प्रक्रिया, अन्नप्रक्रिया तसेच मद्यनिर्मिती, चप्पलनिर्मिती, कापड, पुस्तकेतयार करणे इ. उद्योग चालतात. याच्या परिसरात ऊस, संत्रे, मिरची, मका इ. पिके घेतली जातात. येथील वराह, घोडे व बकरी पालन व्यवसायमहत्त्वाचे आहेत.

 

हालापा थंड व आल्हाददायक हवामानामुळे आरोग्यधाम म्हणूनप्रसिद्ध आहे. येथील व्हेराक्रूझ विद्यापीठ, हालापा विद्यापीठ इ. संस्थांचेउच्च शिक्षणात मोठे योगदान आहे. प्राचीन संस्कृतिविषयक संग्रहालये,लोककला यांच्या प्रभावामुळे यास ‘अथेन्स ऑफ व्हेराक्रूझ’ असे संबोधतात. येथील हालापा कॅथीड्रल, जुआरेझ उद्यान, क्लॅव्हिजेरो वनस्पतिउद्यान, इंटरॅक्टीव्ह म्यूझीयम ऑफ हालापा, सॅन होसे चर्च इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

 

येळणे, नारायणराव