मर्दान : पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रातांतील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,१५,२१८ (१९७२). हे पेशावरच्या ईशान्येस सु. ५३ किमी.वर कल्पानी नदीकाठी वसले आहे. व्हिक्टोरिया राणीच्या लष्करी टेहळणी दलाचे मुख्यालय येथे होते. (१८४६). दर्गाई, नौशहर व पेशावर यांच्याशी रस्ता व लोहमार्ग यांनी मर्दान जोडलेले आहे. उद्योगदृष्ट्या या शहराला वाढते महत्व येत असून कापडगिरण्या, सिगारेटनिर्मितीचा कारखाना व भारतीय उपखंडातील मोठ्या साखरकारखान्यांपैकी एक येथे आहे. अन्नधान्ये, ऊस इत्यादींची ही मोठी व्यापारपेठ आहे. याच्या ईशान्येस सु ११ किमी. वरील शाहबाझगढी येथे सम्राट अशोकाचा एक शिलालेख असून पर्यटकांचे चे आकर्षण आहे.

गाडे, ना.स.