लील : उत्तर फ्रान्सच्या नॉर प्रांताची राजधानी आणि सांस्कृतिक, औद्योगिक व व्यापारी शहर. लोकसंख्या 1,74,039 उपनगरांसह 9,36,295 (1982). हे पॅरिसच्या ईशान्येस 219 किमी. व बेल्जियम सरहद्दीपासून 6 किमी. वर असून सस. पासून सु. 200 मी. उंचीवर दल नदीखोऱ्यात वसले आहे.  

सुरूवातीस खेडेवजा असलेल्या या गावाचा विकास, फ्लँर्ड्सचा चौथा सरदार बाल्डविन याने अकराव्या शतकात गावाभोवती तटबंदी बांधल्यापासून सुरू झाल्याचे मानतात. मध्ययुगीन काळात लीलवरील ताबा क्रमाक्रमाने बदलत राहिला. चौदाव्या लूईने 1667 मध्ये ते बळकावले. 1708 मध्ये ते मार्लबरोच्या ड्यूककडे (सरदाराकडे) गेले, तर अखेरीस 1713 मध्ये उत्रेक्तच्या करारान्वये ते फ्रान्सकडे सुपूर्द करण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत जर्मनांनी शहराची मोठी हानी केली. लीलचा ताबा घेतला होता. 

तुर्की व रूबे या उपनगरांसहित देशातील मोठ्या नगरसमूहांमध्ये  (कोनब्रेशन्स) लीलचा समावेश केला जातो. युरापीय आर्थिक समूहातील उत्तरेकडील देशांच्या समीपतेमुळे तसेच दळणवळण माध्यमांच्या सुविधांमुळे लीलच्या औद्योगिक व व्यापाराविषयक व्यवहारांना मोठी चलना मिळाली आहे. लील हे पॅरिस-डंकर्क-लॉरेन-बाझेल ही शहरे जोडणाऱ्या लोहमार्गांवरील महत्त्वाचे प्रस्थानक असून बेल्जियम मधील मोठी शहरे तसेच फ्रान्समधील पॅरिस यांच्याशी ते रस्त्यांनीही जोडलेले आहे. येथे एक विमानतळ असून दल नदीपासून काढण्यात आलेल्या कालव्यांमधूनही जलवाहतूक चालते. लीलचे वाणिज्यमंडळ अठराव्या शतकापासून क्रियाशील आहे. शहरात विभागीय आर्थिक विकास आयोगाचे कार्यालय, बँक ऑफ फ्रान्सचे शाखा कार्यालय असून वाणिज्य व तांत्रिक विद्यालये, राज्य विद्यापीठ (दूएहून लील येथे स्थलांतर 1885 व पुनर्रचना 1970), रोमन कॅथलिक विद्यापीठ, पाश्र्चर संस्थेचे शाखाकार्यालय इ. शैक्षणिक संस्थांच्या सुविधा दपलब्ध आहेत. सुप्रसिद्ध फ्रेंच सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ व रसायनशस्त्रज्ञ लूई वाश्र्चर हा लील विद्यापीठाच्या शास्त्रशाखेचा अधिष्ठाता असताना (1863) त्याने विद्यापीठ व विविध उद्योग यांच्यामध्ये सुसंवाद व संबंध (ज्ञान व औद्योगिक कौशल्ये यांचे आदानप्रदान करण्याच्या उद्देशाने) वाढविण्यासाठी अनेक प्रयोग केले. लील येथेच पाश्र्चरने किण्वन क्रियेसंबंधीचे आपले संशोधन सुरू केले. 

हे शहर फ्रान्सचे पारंपरिक कापडउद्योगाचे महत्वाचे केंद्र मानले ताते. बॉबिनवर तयार केलेली ‘लील लेस’ सोळाव्या शतकापासून प्रसिद्ध आहे. शहरात लोखंड व पोलाद, यंत्रसामग्री, अन्नप्रक्रिया, रसायने यांचे निर्मितिउद्योग आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारजत्राकेंद्र (स्था. 1925) म्हणूनही लीलला महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे. येथे शेअरबाजार तसेच अनेक बँकशाखा आहेत. 

‘दे ला लिबर्टी’ हा बूलेव्हार (दुतर्फा वृक्षाच्छादित रूंद मार्ग) लीलचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग करतो. याच्या वायव्य टोकाशी सेबास्त्यनी ले प्रेस्त्रे दे व्हॉबँ (1633-1707) फ्रेंच लष्करी अभियंत्याने आकृमिबंध केलेला पंचकोनी भव्य सैनिकी नगरदुर्ग जतन करून ठेवण्यात आला आहे. जुन्या शहराभोवतीची तटबंदी काढून टाकण्यात आली असली, तरी ‘पोर्ते दे पॅरिस’ (1682)  हा भव्य तोरणपथ अवशिष्ट आहे. व्ह्येय बुअर्स (शेअर बाजार) ही फ्लेमिश शैलीतील वास्तू (सतरावे शतक) जनरल द गॉल चौकाशेजारीच आहे. येथील संग्रहालय समृद्ध असून त्यात पंधरा ते वीस या शतकांमधील अनेक दुर्मिळ कलाकृती आहेत. फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष चार्लस् द गॉल याचे लील हे जन्मग्राम होय.  

बागवान, सि. ज. मगर, जयकुमार