गांधीसागर: राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवरील चंबळ प्रकल्पातील एक धरण. हे कोटाच्या नैर्ऋत्येस सु. ८० किमी. वर अTहे. गांधीसागर धरण चंबळ नदीच्या वरच्या टप्प्यात एका निरुंद दरीच्या तोंडाशी बांधले असून याचे बांधकाम चिरेबंदी दगडांचे आहे. माथ्यापाशी याची लांबी ५१४ मी. आणि पायापासून उंची ६५ मी. आहे. पात्रातील याची लांबी ३८१ मी. आणि रुंदी ५१ मी. आहे. याचे पाणलोटक्षेत्र २२,५३३ चौ. किमी. आहे. मोसमी पावसाच्या अनिश्चिततेमुळे, धरणाजवळच्या विद्युत् निर्मितीसाठी पाणीपुरवठा सतत व्हावा, कोटाजवळील जमिनीसही सतत पाणीपुरवठा व्हावा म्हणून जेव्हा प्रमाणापेक्षा पाऊस कमी पडतो, तेव्हा धरणात वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा ठेवण्यात येतो. या योजनेनुसार ५,६०,००० हे. भूमीचे सिंचन होईल व २·१५ लाख किवॉ. वीज निर्माण होईल.

कापडी, सुलभा