रिजायना : कॅनडातील सस्कॅचेवन प्रांताची राजधानी व प्रांतातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या १,७६,३२१ (१९८६ अंदाज). सस्कॅचेवन प्रांताच्या दक्षिण भागात वास्कान क्रीक तीरावर हे वसले असून अ. सं. सं. च्या सरहद्दीपासून उत्तरेस १६० किमी. वर आहे. गोऱ्या वसाहतकारांच्या आगमनापूर्वा क्री इंडियनांनी या भागात रेड्यांच्या शिकारीसाठी अनेकदा तळ ठोकले होते. रेड्यांची शिकार करून त्यांची हाडे ते वास्काना क्रीकच्या काठावर टाकीत असत. हाडांच्या ढिगांवरून इंडियन या ठिकाणाला ‘ओस्कुनाह-कासस-टेक’ असे म्हणत. गोऱ्या लोकांनी त्याचे भाषांतर ‘पाइल ऑफ बोन्स’ (हाडांचा ढीग) असे केले. कॅप्टन जॉन पॅलसर या कॅनडियन समन्वेषकाने या भागाला १८५७ मध्ये भेट दिली. ओस्कुनाह किंवा ओस्काना या क्री इंडियन नावावरून त्याने या ठिकाणाला वास्काना असे नाव दिले. १८८२ मध्ये येथून कॅनडियन-पॅसिफिक लोहमार्ग नेण्यात आल्यावर येथे वसाहतीची स्थापना झाली. १८८३ मध्ये कॅनडा सरकारने वायव्य प्रांताची राजधानी म्हणून पाइल ऑफ बोन्सची निवड केली. त्याच वर्षी ‘रॉयल कॅनडियन मौटेड पोलिस’ दलाच्या प्रशिक्षण केंद्राची येथे स्थापना करण्यात आली. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या सन्मानार्थ या ठिकाणाचे नाव ‘रिजायन’ असे बदलण्यात आले. लॅटिन भाषेत रिजायना म्हणजे राणी होय. रिजायना मैदानी प्रदेशात असल्यामुळे काही वेळा याचा उल्लेख ‘मैदानांची राणी’ असा केला जातो. १९०३ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला.

नव्याने स्थापन झालेल्या (१९०५) सस्कॅचेवन प्रांताची राजधानी म्हणून रिजायनाची निवड करण्यात आली. १९१२ मध्ये झंझावातामुळे शहराचे प्रचंड नुकसान झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर वाहतूक, निर्मितिउद्योग व व्यापार यांचे केंद्र म्हणून रिजायनाचा विशेष विकास झाला. कॅनडियन-पॅसिफिक लोहमार्ग व ट्रान्स-कॅनडियन महामार्ग येथूनच जात असल्याने रिजायना कॅनडाच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांशी जोडले गेले आहे. शहराच्या आसमंतात खनिज संपत्तीचे, विशेषतः खनिज तेल व पोटॅश यांचे बरेच साठे आहेत. रिजायना हे सुपीक प्रेअरी प्रदेशात वसले असून हा कॅनडातील समृद्ध गहू उत्पादक प्रदेश आहे. ‘सस्कॅचेवन व्हीट पूल’ ह्या जगातील सर्वांत मोठ्या सहकारी धान्य व्यापार संघनेचे प्रधान कार्यालय येथेच आहे. शहरात अडीचशेपेक्षा आधिक मिर्मितिउद्योग असून त्यांमधून प्रांताच्या ३३ टक्क्यांहून आधिक औद्योगिक उत्पादने होतात. अन्नप्रक्रिया, कृषी अवजारे, संदेशवहन उपकरणे, रंग, रसायने, सिमेंट, खते, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने, बांधकामाचे साहित्य, खनिज तेल उत्पादने, मद्यनिर्मिती, पोलाद जोडकाम इ. उद्योगधंदे शहरात चालतात. येथील धरणामुळे वास्काना या कृत्रिम सरोवराची निर्मिती झालेली आहे. वास्काना सरोवराच्या सभोवती उद्यानासारखा दिसणारा ‘वास्काना सेंटर’ हा रिजायना शहराचा भाग विशेष आकर्षक असून तेथे विधानभवन, सस्कॅचेवन निसर्गेतिहास वस्तुसंग्रहालय, नॉर्मन मॅकेंझी कलावीथी, कॅनडाचे पंतप्रधान जॉन डिफनबेकर (कार. १९५७−६३) यांचे निवासस्थान, रिजायना विद्यापीठ (१९७४) इ. सुंदर वास्तू आहेत.

चौधरी, वसंत