वालचंदनगर : महाराष्ट्र राज्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडची एक आर्दश उद्योग- नगरी. ती पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात नीरा नदीकाठी वसली आहे. लोकसंख्या २३.१२९ (१९८१). सोलापूर व पुणे शहरांच्या अनुक्रमे पश्चिमेस व आग्नेयीस सु. १३६ किमी. आणि इंदापूरच्या पश्चिमेस ३८ किमी. वर वालचंदनगर असून दक्षिण लोहमार्गावरील भिगवण हे रेल्वे स्थानक या औद्योगिक वसाहतीजवळ आहे.

इंदापूर तालुक्यातील कळंब या खेड्याच्या परिसरात असलेली पडीत व मुरमाड जमीन ⇨ वालचंद हिराचंद यांनी साखर कारखान्यासाठी निवडली आणि त्यापैकी सु. ३६ हेक्टर जमीन खरेदी केली व १,४०० हेक्टर भाडेपट्ट्याने घेतली. या जागेवर मध्यभागी इंग्लंडमधील मार्सलंड प्राइस कंपनीच्या सहकार्याने  साखर  कारखाना आणि तदानुषंगिक जोडधंदे सुरू केले (१९३३). परिणामतः या कारखान्यात व तेथील जोडधंद्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक रेखीव व आधुनिक सुखसोयी असलेली औद्योगिक वसाहत अस्तित्वात आली. तेच विद्यमान वालचंदनगर होय. प्रारंभी ‘कळंब वसाहत’ म्हणून ती परिचित होती. पुढे १९४४ मध्ये परकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी वालचंद हिराचंद यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये येथील उद्योगाचे रूपांतर केले. या वसाहतीत टुमदार घरे, रेखीव रस्ते आणि पाण्याचा निचरा होणारी गटारे असून पाणीपुरवठा, वीज आदी सुविधांनी ती सुसज्ज आहे. वसाहतीत आधुनिक सुविधांनी युक्त असे साठ खाटांचे रुग्णालय असून त्यात सर्व वैद्यक उपशाखांतील तज्ञ वैद्य व अत्याधुनिक तांत्रिक सोयी आहेत. वसाहतीत दोन पूर्वप्राथमिक आणि चार प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून इंग्रजी माध्यमाची पूर्व– प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळाही आहे. प्रशस्त क्रीडांगण व क्रिडा विहार (मंडळ) आहे. त्यातून देशी-विदेशी खेळांची व करमणुकीची सोय केलेली असून एक सार्वजनिक उद्यान (भारत विहार उद्यान) व एक चित्रपटगृह आहे. सहकारी तत्त्वांवर चालविलेले पुरवठा भांडार, सहकारी बँक, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी औद्योगिक उत्पादन संस्थेद्वारा पूरक उद्योग इ. उपक्रम वसाहतीत चालतात. वसाहतीत तीन राष्ट्रीयीकृत बॅंका, डाक कार्यालय, दूरध्वनी केंद्र आणि जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. गुरुवारी व रविवारी येथे बाजार भरतो.

वालचंदनगर परिसरात ऊस हे प्रमुख पीक असून स्वातंत्र्यपूर्व काळात कंपनीतर्फे अवजड, उचित आणि अद्ययावत अवजारांच्या साहाय्याने येथील शेती करण्यात येत होती. त्यामुळे अल्पकाळात शास्त्रीय पद्धतीने उसाचे उत्पादन व साखरेच्या उताऱ्याचे प्रमाण वाढवून साखरनिर्मिती क्षेत्रात उसाचा सर्वांगीण उपयोग करणारा एक स्वतंत्र असा आदर्श त्या काळात कंपनीने निर्माण केला होता. कंपनीने त्यावेळी ज्वारी,बाजरी, गहू, कापूस, भाजीपाला पिकवून स्थानिक कामगारांना रास्त दरात धान्य – भाजीपाला तसेच दुभती जनावरे पाळून दूध व दुग्धजन्य पदार्थ पुरविणे इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. उसाच्या चिपाडांपासून कागद तयार  करणे वनस्पती तूप, साबण व डबे तयार करणे,तेलगिरणी इ. उद्योगही सुरू केले होते. काकवीपासून मद्य (स्पिरीट) बनविण्याची आसवनी १९४२ मध्ये कंपनीने उभारली होती.

स्वातंत्र्योत्तर काळात वालचंदनगर हे केवळ शेती व साखरनिर्मिती यांचे केंद्र न राहता आधुनिक उद्योगधंद्यांचे प्रभावशाली क्षेत्र बनले. कमाल जमीन धारणा कायद्यानुसार (१९६१) महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाकडे येथील जमिनीचे १९६३ साली हस्तांतरण करण्यात आले. पुढे वालचंदनगर इंडस्ट्रीजने साखर कारखाना इंदापूर सहकारी साखर कारखान्यास विकला (१९८८) आणि तो इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथे हलविण्यात आला. तत्पूर्वी वालचंदनगर इंडस्ट्रीजने अन्य उद्योगंधद्यांवर लक्ष केंद्रित करून औद्योगिक यंत्रसामग्री बनविण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला (१९५५). सुरुवातीस वालचंदनगर इंडस्ट्रीजने साखर कारखान्यांना लागणारे काही सुटे भाग तयार करण्यास प्रारंभ केला. पुढे या कारखान्याचे रूपांतर सिमेंट, बाष्प जनित्रे, युद्धनौकांसाठी उच्च शक्तिशाली अचूक व दंतचक्र पेट्या (गिअर बॉक्स), अणुभट्टी साधने इ. बनविणाऱ्या मोठ्या कारखान्यात झाले (१९६९). याबरोबरच अणुऊर्जा प्रकल्प, उपग्रह क्षेपणसाधने, देशाच्या संरक्षणासाठी लागणारे क्षेपणास्त्रांचे सुटे भाग इत्यादींचे उत्पादन येथे होऊ लागले.  सांप्रत अणुशक्ती कार्यक्रमात वालचंदनगर एक अविभाज्य भागीदार आहे. वालचंदनगर इंडस्ट्रीजने १९८३-८४ साली आशिया खंडातील सर्वांत मोठी दुर्बिण बनविली.

संदर्भ : १. खानोलकर, गं. दे. वालचंद हिराचंद : व्यक्ति,काळ व कर्तृत्व, मुंबई, १९६५,

           २. भावे, सविता, जिंकिले भूमि-जल-आकाश :  वालचंद हिराचंद चरित्र, पुणे, १९८५.

देशपांडे, सु. र.

Close Menu
Skip to content