डेटन : अमेरिकेच्या ओहायओ राज्यातील प्रमुख शहर. सिनसिनॅटी शहराच्या इशान्येस सु. ७३ किमी. असून ग्रेट मिआमिचे पूर मैदानात स्टिलवॉटर व मॅड नदी यांच्या संगमावर वसले आहे. लोकसंख्या उपनगरांसह ६,८५,९४२ (१९७०). हे लोहमार्गाचे, औद्योगिक, व्यापारी व महत्त्वाचे वितरण केंद्र आहे. येथे मोठा विमानतळ असून विमानविद्याविषयक मोठे संशोधन केंद्र व प्रयोगशाळा आहेत. शीत पेटिका, वातानुकूलन यंत्रे, अचूक यंत्रे, विजेच्या मोटारी, रबरी वस्तू व खेळाचे सामान वगैरेंचे येथे उत्पादन होते. येथे डेटन विद्यापीठ, सिंक्लेअर महाविद्यालय, अणुसंशोधनाकरिता माउंट प्रयोगशाळा आणि १९११ साली स्थापन झालेली राइट बंधू यांची विमानोड्डाणासंबंधी संशोधन शाळा इ. शैक्षणिक संस्था आहेत.
लिमये, दि. ह.