धनुष्कोडी : धनुष्कोटि, धनुष्तीर्थ. द. भारतातील एक तीर्थक्षेत्र. रामेश्वरच्या आग्नेयीस ३९ किमी.वर, पांबन (रामेश्वर) बेटाच्या दक्षिण टोकास हे वसवे आहे. महोदधी व रत्नाकर म्हणजेच अनुक्रमे हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांचा संगम या ठिकाणी होतो. दक्षिण रेल्वेचे हे अंतिम स्थानक असून श्रीलंकेला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी प्रथम यावे लागते. रामेश्वर यात्रेच्या परिपूर्तीसाठी भाविक लोक येथे येऊन समुद्रस्नान करतात. लंकेवरील स्वारीसाठी रामाने या ठिकाणापासून सेतू बांधला होता आणि नंतर भारतातून लंकेवर पुन्हा स्वाऱ्या होऊ नयेत म्हणून, बिभीषणाच्या विनंतीवरून धनुष्याच्या कोटीने म्हणजे टोकाने तो मोडून टाकला म्हणूनच या ठिकाणाचे नाव ‘धनुष्यकोटी’ पडले असे म्हणतात. रावणवधाचे पातक नष्ट होण्यासाठी रामाने स्वतः येथे स्नान केले व आपले धनुष्यही धुतले अशा कथा पुराणांत आढळतात. स्कंदपुराणात (३३·६५-६८) या सेतूचे माहात्म्य वर्णिले आहे. सागरसंगमावर स्नान, सुवर्ण धनुष्यदान, पिंडदान इ. विधी यात्रेकरू करतात. आषाढ व माघ महिन्यांत येथे स्नान करणे विशेष पुण्यप्रद मानले जाते. हे तीर्थ महापातकनाशक व मोक्षप्रद मानले आहेत. पांबन–धनुष्कोडी लोहमार्ग १९६४ सालच्या वादळात उद्‌ध्वस्त झाला, पण सध्या त्याची दुरुस्ती सुरू आहे. धनुष्कोडीहून श्रीलंकेला जाण्यासाठी बोटी सुटतात.

दातार, नीला