त्रिजुगीनारायण : उत्तर प्रदेश राज्याच्या टेहरी गढवाल जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र. हे रुद्रप्रयागपासून ७ किमी. वर केदारनाथच्या नैर्ऋ‌त्येस आहे. येथील त्रिजुगीनारायण मंदिरात विष्णू, लक्ष्मी यांच्या धातूच्या मूर्ती व बाहेर अन्य देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरपरिसरात ४ कुंडे असून ब्रह्म व रुद्र कुंडांत स्नान, विष्णुकुडांतील तीर्थोदक प्राशन व सरस्वतीकुडांत पितरांना तर्पण केले जाते. सभामंडपातील अग्निकुंड शिव–पार्वती विवाहप्रसंगीचे असल्याची आख्यायिका आहे. हे कुंड तीन युगांनंतरही जागृत राहिले म्हणून या ठिकाणास त्रिजुगीनारायण (त्रियुगीनारायण) म्हणतात. कुंडातील अग्नी जागृत रहावा म्हणून यात्रेकरू त्यात समिधा टाकतात.

सावंत, प्र. रा.