धनबाद : बिहार राज्यातील याच नावाच्या जिल्हाचे मुख्य ठिकाण व एक औद्योगिक केद्र. लोकसंख्या ७९,८३८ (१९७१). दामोदर खोऱ्यात वसलेले हे शहर पूर्व लोहमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून राष्ट्रीय महामार्गापासून दक्षिणेस ८ कीमी. आहे. लोहमार्गाने कलकत्यापासून सु २७० किमी. असलेले हे शहर झारिया कोळसा-क्षेत्राच्या पूर्वेस आहे. तुलनेने नवीन असलेल्या ह्या शहराभोवती कृत्रिम जलाशय आहेत. १९५६ पासून धनबाद जिल्हाचे मुख्य केद्र असून १९१९ येथे नगरपालिका आहे. जवळच असलेले झारिया हे प्रसिद्ध कोळसा-क्षेत्र आणि दळणवळणाच्या उत्तम सोयी याचा धनादाबादच्या औद्योगीक विकासावर चांगलाच परीणाम झालेला आहे. याच्या जवळील सिद्री येथे खत कारखाना तर जियालगोडा येथे राष्ट्रीय इंधन संशोधन केद्र आहे. निरनिराळे उद्योगधंदे आणि कारखाने यांच्या स्थापनेमुळे धनबाद, झारीया व सिंद्रि याचे एक नगरसमुहात रुपांतर होत आहे. शहरात सर्व आवश्यक सोयी असून याचा समावेश दुसऱ्या वर्गाच्या शहरात होतो. बिहार विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ‘इडीयन स्कूल ऑफ माइन्स अँड अप्लाइड जिऑलॉजी’ व ‘नॅशनल प्यूएल रिसर्च इन्स्टिट्यूट’, या प्रशिक्षण संस्था येथे असुन भारतातील बऱ्याच खाण अभियंता आणि प्रबंधक यांनी येथेच प्रशिक्षण घेतलेले आहे. धातुसामान, विद्युत् व दूरसंदेशवहन उपकरणे, कारखान्यांसाठी लागणारी यंत्र सामुग्री, काच अन्नप्रक्रीया आणि उपभोग्य वस्तूचे बरेच कारखाने येथे आहेत. याच्या आसमंतात भात तेलबिया, बाजरी, मका ऊस इ. पिके होतात. औद्योगीक तसेच शेतमालाच्या व्यापाराचे हे एक प्रमुख केद्र आहे.

चौधरी, वसंत