फ्लॉरिडा : अमेरिकेच्या संयुक्त संस्थनांपैकी एक द्वीपकल्पीय राज्य. देशाच्या आग्नेय कोपऱ्यात ते वसले आहे. अक्षयवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २४° ३०’ उ. ते ३१° उ. अक्षांश व ७९° ४८’ प. ते ८७° ३८’ प. रेखांश यांदरम्यान आहे. कमाल लांबी ७२४ किमी. व रुंदी ६०४ किमी. क्षे़त्रफळ १,५१,६७० चौ. किमी. लोकसंख्या ८४,५२,००० (१९७७ अंदाज). फ्लॉरिडाच्या उत्तरेस ॲलाबॅमा व जॉर्जिया ही राज्ये, पूर्वेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस फ्लॉरिडा सामुद्रधुनी तर पश्चिमेस मेकिस्कोचे आखात व ॲलाबॅमा राज्य आहे. १८४५ मध्ये २७ व्या क्रमांकाने हे संयुक्त संस्थानांत विलीन झाले. टॅलाहॅसी (लोकसंख्या ७७,८५१ -१९७०) ही त्याची राजधानी.

 

भूवर्णन : मेक्सिकोचे आखात आणि अटलांटिक महासागर यांच्या दरम्यानचे हे द्वीपकल्प म्हणजे उथळ सागरमग्न खंडभूमीचा उद्‌गमन झालेला भाग होय. राज्याचा बराच भाग सखल, ३० मी. पेक्षा कमी उंचीचा आहे. बराचसा प्रदेश चुनखडकयुक्त आणि गाळाच्या संचयाने दलदलींनी व्यापलेला आहे. प्रथम ह्या भागाची भूरचना सामान्यपणे एकसारखी होती परंतु वाहते पाणी, सागरी लाटा व प्रवाह, वारे, बदलती समुद्रपातळी, चुनखडकांवरील रासायनिक प्रक्रिया इ. घटकांनी राज्याच्या मूळ भूरचनेत थोड्याफार प्रमाणात बदल घडवून आणले. त्यांनुसार राज्याचे प्रमुख सात प्राकृतिक विभाग पाडता येतात : (१) किनाऱ्यालगतचा मैदानी प्रदेश, (२) दक्षिणेकडील एव्हरग्लेड्झ प्रदेश, (३) किसिमी मैदानी प्रदेश, (४) मॅरीॲना मैदानी प्रदेश, (५) मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश, (६) टॅलाहॅसी टेकड्या, (७) पश्चिमेकडील उंचवट्याचा प्रदेश. राज्याच्या किनाऱ्यावर अनेक वाळूचे दांडे, खारकच्छ व बेटे आढळतात. द्वीपकल्पाच्या दक्षिणेस चुनखडक व प्रवाळ खडकयुक्त अशी ‘फ्लॉरिडा कीज’ (बेटांची मालिका) आहे. एव्हरग्लेड्झ प्रदेश (१३,००० चौ. किमी.) पूर्वी दलदलयुक्त होता. परंतु अलीकडे तेथील बरीच दलदल हटवून तिचे शेतीयोग्य जमिनीत रूपांतर करण्यात आलेले आहे. मॅरीॲना मैदानी प्रदेशातील चुनखडकांमध्ये बऱ्याच कुंभगर्ता आढळतात तर मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशात हजारो सरोवरे व अनेक झरे आहेत. पश्चिमेकडील उंचवट्याच्या प्रदेशात राज्यातील १०५ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे.

 

फ्लॉरिडात रेतीमिश्रित जमिनीचे प्रमाण अधिक आहे. रेतीमिश्रीत, रेतिमीश्रीत चिकण, चिबडयुक्त व सेंदिगय इ. प्रमुख मृदाप्रकार या राज्यात आढळतात.

 

राज्यात चुनखडी व फॉस्फेटचे प्रमाण अधिक असून देशाच्या ८४% व जगाच्या ३०% फॉस्फेट येथून काढले जाते. याशिवाय मुलतानी माती, मोनॅझाईट, इल्मेनाइट, पीट, रूटाईल, केओलीन, झिरकॉन, विविधोपयोगी खडक, वाळू व माती इ. खनिजद्रव्ये येथे आहेत. फ्लॉरिडाची भूपृष्ठरचना अवसादी प्रकारची असली, तरी खनिज तेलाचे साठे मात्र विशेष नाहीत. सेंट जॉन्स ही राज्यातील सर्वात मोठी नदी. मेलबर्नपासून उत्तरेस ४४३ किमी. अटलांटिक महासागराला समांतर वाहत जाऊन राज्याच्या ईशान्य कोपऱ्यात ती अटलांटिकला मिळते. याशिवाय सेंट मेरी, पर्डीडो, ॲपालॅचिकोला, सवानी, किसिमी, कलूसहॅची या इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. राज्यातील काही नद्या अटलांटिकला, काही मेक्सिकोच्या आखाताला, तर बऱ्याचशा नद्या राज्यातील सरोवरांना मिळतात.

 

राज्यात लहानमोठी सु. ३०,००० सरोवर असून ओकीचोबी हे सर्वांत मोठे (१,८०० चौ. किमी.) गोड्या पाण्याचे सरोवर होय. सरोवर तुडुंब भरून ओसंडणारे पाणी कालव्यांद्वारे काढून घेतले जाते. सरोवराभोवती बांधही घातले आहेत.

 

राज्यात चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे बरेचसे झरे निर्माण झाले आहेत. देशातील एकूण ७५ मोठ्या आर्टेशियन प्रकारच्या झऱ्यांपैकी १८ झरे एकट्या फ्लॉरिडा राज्यात आहेत. त्यांपैकी सिल्व्हर, रेन्‌बो, व्हाइट, सॉल्ट, बॉकूला हे झरे महत्त्वाचे आहेत. सिल्व्हर ह्या राज्यातील सर्वात मोठ्या झऱ्यातून तासाला १२,६४,५४,००० लिटर पाणी बाहेर पडते. यांपैकी काही झरे स्वच्छ पाण्याचे आहेत.

 

हवामान : राज्यातील हवामान सौम्य आहे. हिवाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, यामुळेच याला ‘सूर्यप्रकाशाचे राज्य’ (सन्‌शाइन स्टेट) असे संबोधिले जाते. इतर राज्यांच्या मानाने येथील हवामान आर्द्र असते. समुद्रसान्निध्यामुळे उन्हाळ्याची व हिवाळ्याची तीव्रता कमी असते. हवामानानुसार फ्लॉरिडाचे दोन प्रमुख विभाग पाडता येतात : (१) ओकीचोबी सरोवराच्या दक्षिणेकडील उष्ण कटिबंधीय हवामानाचा प्रदेश व (२) उत्तरेकडील उपोष्ण कटिबंधीय हवामानाचा प्रदेश. राज्याचे जानेवारी व जुलैचे तपमान अनुक्रमे १५° से. व २७° से. असते. उन्हाळ्याची स्थिती राज्यभर सर्वसाधारणपणे सारखीच असते. पर्जन्याची वार्षिक सरासरी १३५ सेमी. असून सर्वांत जास्त पाऊस उन्हाळ्यात पडतो. उत्तरेत कधीकधी हिमवृष्टी होते. जुलै ते ऑक्टोबर (विशेषतः सप्टेंबरात) या काळात हरिकेन वादळांचा चांगलाच तडाखा बसतो. वर्षातून एखादेतरी असे वादळ होतेच. १९२६ मधील हरिकेनमुळे ७५ द. ल. डॉलरची वित्तहानी झाली तर १९२८ मधील हरिकेनमुळे २,००० लोक मरण पावले. अनेकदा या वादळांचा वेग ताशी २४० किमी. पेक्षाही अधिक असतो.

 

वनस्पतीवप्राणी: राज्याची सु. ६०% भूमी वनाच्छादित आहे. वनस्पतिजीवन समृद्ध असून देशातील सु. निम्मे वनस्पतीप्रकार या राज्यात आढळतात. तीनशेपेक्षा अधिक प्रकारचे वृक्ष येथे आहेत. त्यांपैकी पाइन, ओक, सायप्रस, मॅग्नोलिया, महॉगनी, गंबो-लिंबो, स्वीट गम, बीच, विविध प्रकारचे ताड, रेड मेपल, ट्युलिप, पाल्मेटो, हिकरी, यू, हॉली हे प्रमुख वृक्षप्रकार आहेत. दक्षिणेकडील दलदलमय प्रदेशात कच्छ वनश्री आढळते. याशिवाय विविध प्रकारची फुलझाडेही आढळतात.

 

वनस्पतींप्रमाणेच फ्लॉरिडामध्ये प्राणीजीवनही समृद्ध आहे. राज्यात ८४ प्रकारचे प्राणी, ४०० पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी, ७०० पेक्षा अधिक प्रकारचे मासे व ४० प्रकारचे साप आढळतात. प्राण्यांमध्ये कुत्र्यासारखी ओरडणारी व तीक्ष्णदंती खार, कोल्हा, हरिण, अस्वल, रानमांजर, ऑपॉस्सम, प्यूमा, ऊद मांजर, मिंक, डुक्कर व पक्ष्यांमध्ये कुरव, बगळा, पेलिकन, आयबिस, हंसक, टर्की, लावा, बदक इ. जाती महत्त्वाच्या आहेत. फ्लॉरिडाभोवतीचा सागरी प्रदेश म्हणजे क्रीडेसाठी व मासेमारीसाठी फ्लॉरिडाला लाभलेले नंदनवनच आहे. बास, ब्रीम, पर्च, मांजरमासा, मुलेट, मेनहाडेन, ड्रम, ट्राउट, पाँपॅनो, मॅकेरेल, स्नॅपर, स्नूक, ग्राउपर, टार्पोन, मार्लीन, सेलफिश, बोनिटो, ब्लूफिश, डॉल्फिन इ. प्रकारचे मासे या सागरी प्रदेशात सापडतात. खडखड्या साप, मॉकसिन, कोरल इ. प्रकारचे साप तसेच सुसरी, मगरींसारखे प्राणीही येथे आढळतात.

 


इतिहासवराजकीयस्थिती : फ्लॉरिडातील मूळ रहिवासी म्हणजे इंडियन लोक. सु. दहा हजार वर्षांपूर्वीपासून त्यांचे या भागात वास्तव्य असावे. यूरोपिय वसाहतकार या भागात आले, त्यावेळी मुख्य चार जमातींचे सु. १०,००० इंडियन येथे रहात होते. त्यांपैकी शिकार व मासेमारी करणारे कॅलुसा व तेक्वेस्ता इंडियन दक्षिणेत, तिमुकुआ मध्य व ईशान्य भागांत, तर शिकार व शेतीव्यवसाय करणारे ॲपॅलॅची वायव्य प्रदेशात होते. सोने व कीर्ती मिळविण्याच्या उद्देशाने निघालेला स्पॅनिश समन्वेषक ह्‌वान पॉन्से दे लेआँ हा फ्लॉरिडाच्या भूमीवर पाऊल ठेवणारा पहिला यूरोपीय होय (१५१३). लेआँला येथे आढळलेल्या भरपूर फुलांवरून या भूमीला ‘फ्लॉरिडा-फुलांचे माहेरघर’ हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने तो १५२१ मध्ये पुन्हा येथे आला. मात्र इंडियनांशी झालेल्या चकमकींत तो व त्याचे लोक जखमी झाले व त्यातच पुढे लेआँचा अंत झाला. त्यानंतर १५२८ मध्ये पानफिलो द नार्व्हाएस आणि मे १५३९ मध्ये हरनांदो दे सोटो हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर या भागात आले होते. पुढे स्पॅनिश समन्वेषक ट्रीस्टन दे ल्यूना याने १५५९ मध्ये पेन्साकोला येथे वसाहत स्थापन केली. तथापि इंडियनांनी सतत केलेल्या प्रतिकारामुळे दोन वर्षांतच ही वसाहत नष्ट झाली.

 

एका फ्रेंच पंथीयांच्या तुकडीने १५६४ मध्ये सेंट जॉन्स नदीजवळ एक वसाहत स्थापन करून विद्यमान जॅक्सनहिलजवळ फोर्ट कॅरोलायना हा किल्ला उभारला. स्पेनचा राजा दुसरा फिलीप याने फ्लॉरिडातील ही फ्रेंच वसाहत नष्ट करण्यासाठी कॅप्टन डॉन पेद्रो मेनेंडेझ दे एव्हिल्स याला पाठविले. मेनेंडेझने १५६५ मध्ये सेंट ऑगस्टीन ही पहिली कायमची वसाहत स्थापन केली आणि फ्रेंचांची कत्तल करून फोर्ट कॅरोलायना आपल्या ताब्यात घेतला. पुढील दोनशे वर्षाच्या कालावधीत उ. फ्लॉरिडात इंग्लंडने, तर पश्चिम फ्लॉरिडात फ्रान्सने आपल्या वसाहती स्थापन केल्या. अठराव्या शतकाच्या मध्यात ब्रिटिश व फ्रेंच यांच्यात उद्‌भवलेल्या युद्धात स्पेनने फ्रान्सची बाजू घेतली. १७६२ मध्ये इंगज सैन्याने क्यूबावर ताबा मिळविला. परंतु १७६३ मध्ये स्पेनने क्यूबच्या बदल्यात फ्लॉरिडा इंग्लंडला दिला.

 

फ्लॉरिडा आपल्या ताब्यात आल्यावर इंग्लंडने पूर्व व पश्चिम अशा फ्लॉरिडाच्या दोन स्वतंत्र वसाहती स्थापन केल्या. याच अमेरिकेतील तेराव्या व चौदाव्या ब्रिटिश वसाहती होत. पश्चिम फ्लॉरिडाचे पेन्साकोला, तर पूर्व फ्लॉरिडाचे सेंट ऑगस्टीन हे मुख्य ठाणे होते. प. फ्लॉरिडात सध्याच्या ॲलाबॅमा, मिसिसिपी व लुइझिॲना राज्यांतील काही प्रदेशांचाही समावेश होता. १७७९ मध्ये स्पॅनिश फौजांनी पश्चिम फ्लॉरिडावर केलेल्या आक्रमणामुळे १७८१ पर्यंत ब्रिटिशांना पश्चिम फ्लॉरिडाचा त्याग करावा लागला. १७८३ पर्यंत संपूर्ण फ्लॉरिडावरील हक्कच ब्रिटिशांना सोडावा लागून त्यावर पुन्हा एकदा स्पेनचा अंमल सुरू झाला. १८२१ पर्यंत त्यावर स्पेनचीच सत्ता होती.

 

हा प्रदेश १८२१ मध्ये अमेरिकेच्या ताब्यात आला. १८२२ मध्ये काँग्रेसने फ्लॉरिडा प्रदेशासाठी राज्यपालाची नेमणूक केली. १८४५ पर्यंत हा प्रदेश ‘फ्लॉरिडा टेरिटरी’ म्हणूनच राहिला. या काळात फ्लॉरिडाचा आर्थिक विकास चांगला होऊ लागला होता. तथापि फ्लॉरिडातील सेमिनोल इंडियनांना पश्चिमेकडील प्रदेशात पाठविण्याच्या प्रश्नावरून उद्‌भवलेल्या व अत्यंत दुर्दैवी ठरलेल्या दुसऱ्या सेमिनोल युद्धामुळे (१८३५-४२) फ्लॉरिडाच्या आर्थिक विकासाला खिळ बसली

 

फ्लॉरिडाचा ३ मार्च १८४५ रोजी सत्ताविसाव्या क्रमांकाचे राज्य म्हणून अमेरिकेत समावेश करण्यात आला. परंतु १० जानेवारी १८६१ रोजी हे राज्य संघराज्यातून फुटून निघून राज्यसंघाला जाऊन मिळाले. यादवी युद्धाच्या काळात (१८६१-६५) फ्लॉरिडात काही लढाया झाल्या. त्यांपैकी ऑल्यूस्टी लढाई (२० फेब्रुवारी १८६४) विशेष महत्त्वाची आहे. या लढाईत राज्यसंघाच्या सैन्याने संघराज्याचा पराभव केला. या युद्धानंतर फ्लॉरिडात लष्करी अंमल आणण्यात आला व राज्याच्या घटनेमध्ये निग्रोंच्या मतदानाविषयी तरतूद करण्यात आली. २५ जून १८६८ मध्ये फ्लॉरिडा संघराज्यात आले.

 

यादवी युद्धानंतरच्या काळात फ्लॉरिडाच्या आर्थिक विकासाकडे अधिक लक्ष देण्यात आले. वाहतुकीच्या सोयींत सुधारणा करण्यात आल्या. नवे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सरकारने उद्योगपतींना विविध सवलती दिल्या. दरम्यान राज्यात फॉस्फेटचे साठेही मोठ्या प्रमाणावर सापडले. दलदली हटवून तेथे शेती करण्यास सुरुवात झाली. पर्यटन व्यवसायाचीही भरभराट होऊ लागली. व्यापारात वृद्धी झाली. १९२५ पर्यंत राज्याचा आर्थिक विकास चांगल्या प्रकारे घडून आला. तथापि त्यानंतरच्या मंदीच्या काळात व तसेच हरिकेनसारख्या आपत्तींमुळे आर्थिक विकास खुंटला. दुसऱ्या महायुद्धापासून पुन्हा येथील आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. राज्याच्या आर्थिक विकासाचा प्रमुख घटक समजल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायाचाही विकास करण्यात आला. ब्रिव्हार्ड परगण्यातील केप केनेडी (पूर्वीचे केप कनॅव्हरल) येथे जॉन एफ्. केनेडी या अवकाश केंद्राची स्थापना करून तेथून ३१ जानेवारी १९५८ रोजी देशातील पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. अपोलो ११ हे मानवासह चंद्रावर जाणारे पहिले यान १९६९ मध्ये तसेच ‘कोलंबिया’ हे अंतराळयान सेवेतील पहिले यान एप्रिल १९८१ मध्ये येथूनच सोडण्यात आले.

 

कायदेमंडळाने १८८५ च्या घटनेची पुनर्रचना करून १९६९ मध्ये राज्याची नवीन घटना अंमलात आणली. तीनुसार राज्याच्या विधीमंडळात चार वर्षांसाठी निवडलेले सीनेटचे ४० सभासद व दोन वर्षांसाठी निवडलेल्या प्रतिनिधीगृहाच्या १२० सभासदांचा समावेश असतो. वर्षातून एकदा ६० दिवसांचे अधिवेशन भरते. राज्यपालाची नियुक्ती चार वर्षांसाठी केली जाते. या राज्यातून दोन अधिसभा सदस्य व पंधरा प्रतिनिधी निवडून काँग्रेसवर पाठविले जातात. राज्याची विभागणी एकूण ६७ परगण्यांमघ्ये करण्यात आलेली आहे.

 

आर्थिकस्थिती : कृषी, उद्योग, व पर्यटन अशी मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था फ्लॉरिडात आढळते. कृषी हा फ्लॉरिडाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. कापूस, तंबाखू, ऊस, मका, वाटाणे, बटाटे, लिंबू जातीची फळे, भाजीपाला, सोयाबीन ही राज्यातील प्रमुख पिके आहेत. लिंबू जातीच्या फळांच्या उत्पादनात फ्लॉरिडाचा देशात प्रथम क्रमांक लागत असून देशाच्या एकूण उत्पादनाच्या ७०% उत्पादन एकट्या फ्लॉरिडातून घेतले जाते. नारिंगे, पेरू, आंबे, पपया, अननस, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, लिंबे, टँजेलॉस, टँजेरिन, खरबुजे, कलिगंडे हे येथील महत्त्वाची फळे आहेत.

 

भाजीपाल्याच्या उत्पादनातही कॅलिफोर्नियानंतर फ्लॉरिडाचा देशात दुसरा क्रमांक लागतो. यात टोमॅटो, बटाटे, कोबी सेलरी यांचे उत्पादन महत्त्वाचे आहे. यांशिवाय द्विदल धान्ये व हिरव्या मिरीचे उत्पादनही घेतले जाते. तंबाखूचे उत्पादन उत्तर फ्लॉरिडात, तर उसाचे उत्पादन ओकीचोबी सरोवराच्या दक्षिण भागात घेतले जाते. १९७७ मध्ये कृषी उत्पादनापासून १,८४० द. ल. डॉलर उत्पन्न मिळाले.

 

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच पशुपालन व्यवसाय विकसित झालेला आहे. १९७७ मध्ये गुरांपासून ७५० द. ल. डॉलरचे उत्पन्न मिळाले. उत्तर-मध्य फ्लॉरिडातील कुरणांमध्ये घोड्यांच्या पैदाशीचे प्रमाण वाढत आहे.

 


 

येथील फुलांच्या रोपवाटिका व्यापारी दृष्ट्या विशेष महत्त्वाच्या असून येथून क्रिसॅनथिमस, ग्लॅडिओलस व गुलाबांची रोपे देशभर पाठवली जातात. कठीण व मऊ अशा दोन्ही प्रकारचे लाकूड येथील वनविभागात उपलब्ध असून त्यावर आधारित उद्योगधंदे निघाले आहेत. लगदा व कागद कारखाने महत्त्वाचे असून देशाच्या १०% कागदाचे उत्पादन या राज्यातून घेतले जाते. या दृष्टीने पाइन वृक्ष विशेष महत्त्वाचा आहे.

 

फ्लॉरिडाला लाभलेला समुद्र किनारा व राज्यातील अनेक झरे, सरोवरे आणि नद्या यांमुळे राज्याला मासेमारीसाठी बरेच मोठे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. कोळंबी, खेकडे, मुलेट, मॅकेरेल, ऑयस्टर, स्नॅपर इ. मासे महत्त्वाचे आहेत. १९७६ मध्ये ८८ द. ल. डॉ. किंमतीचे १५६ द. ल. पौंड मासे उपलब्ध झाले. एकूण उत्पादनाच्या सु. ७०% मासे खाद्यान्न म्हणून आणि उरलेले खतांसाठी व तेलासाठी वापरले जातात. टार्पन येथील स्पंज उद्योगही महत्त्वाचा आहे.

 

फॉस्फेट हे फ्लॉरिडातील प्रमुख खनिज असून १९७७ मध्ये त्याचे उत्पादन १,६०४·६ द. ल. डॉ. किंमतीचे होते. फॉस्फेटचा वापर मुख्यतः खतनिर्मितीसाठी केला जातो. राज्यात मिळणाऱ्या चुनखडीचा उपयोग रस्ते व इमारतीच्या बांधकामासाठी तसेच चुना व सिमेंट तयार करण्यासाठी केला जातो. मुलतानी मातीचा वापर खनिज तेलशुद्धीकरणात होतो.

 

दुसऱ्या महायुद्धानंतर राज्यातील निर्मितीउद्योगाचा विशेष विकास होत गेला. अन्नप्रक्रिया, रसायने, यांत्रिक उपकरणे, धातुकाम, लाकूडतोड, लाकडापासून लगदा तयार करणे हे येथील प्रमुख उद्योग आहेत. अन्नप्रक्रियेमध्ये फळांचा रस व फळे तसेच मासे डबाबंद करणे मद्ये व मुरंबे तयार करून ते डबाबंद करणे इत्यादींचा समावेश होतो. रसायन उद्योगात निर्जल अमोनिया, मिथेनॉल, पॉलिव्हिनिल, रोझीन, टर्पेंटाइन, इ. रसायने व रसायन-उत्पादने तसेच नायलॉन उत्पादनाचा समावेश होतो. यांशिवाय विद्युत् उपकरणे, कागद व कागदी वस्तू, वाहतुकीची साधने, काच वस्तू, छपाई इ. उद्योगांचाही विकास झालेला आढळतो. क्षेपणास्त्रांची निर्मिती व चाचणी यांसाठी फ्लॉरिडा प्रसिद्ध आहे. १९७६ मध्ये राज्यात असलेल्या ९,७६० निर्मितिउद्योगांत ३,४८,१०८ कामगार होते. जॅक्सनव्हिल, टँपा, मिआमी, ऑर्‌लँडो ही प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत. राज्यातील बहुतेक सर्व विद्युत्‌शक्ती ही इंधनापासून तयार केली जाते १९७६ मध्ये राज्यात ५७६ व्यापारी बँका होत्या.

 

वाहतूकवसंदेशवहन : १९७५ मध्ये राज्यात १,५६,८०० किमी. लांबीचे रस्ते ६,५२० किमी लांबीचे लोहमार्ग व ३३० विमानतळ होते. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीच्या दृष्टीने राज्याचे स्थान मोक्याचे आहे. मिआमी हा आंतरराष्ट्रीय विमानतळ नेहमीच गजबजलेला असतो. नौसेनेचे सहा व वायुसेनेचे सात तळ फ्लॉरिडात आहेत. फ्लॉरिडाचा समुद्रकिनारा जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याशिवाय नद्या, सरोवरे व कालवे हेही वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. सेंट जॉन्स व विथलाकूची या नद्यांच्या दरम्यान क्रॉस-फ्लॉरिडा बार्ज कॅनॉल काढण्याचे काम १९६४ पासून सुरू झाले. या कालव्यामुळे मेक्सिकोचे आखात व अटलांटिक महासागर एकमेकांना जोडले जाणार असून त्यामुळे स्पॅनिश काळापासूनचे स्वरूप साकार होणार आहे. तथापि १९७१ मध्येच अध्यक्ष निक्सन यांनी या कालव्याचे काम स्थगित केले होते. राज्याप्रमाणेच देशाच्या दृष्टीनेही येथील १५ बंदरे महत्त्वाची आहेत. त्यांपैकी पूर्व किनाऱ्यावरील जॅक्सनव्हील, पोर्ट एव्हरग्लेड्झ, मिआमी आणि टँपा शार्लट ही आखातीवरील बंदरे प्रमुख होत.

 

राज्यात १९७२ मध्ये ४५,४६,१०० दूरध्वनियंत्रे होती. टँपा हे राज्यातील पहिले आकाशवाणी केंद्र (स्था. १९२२), तर मिआमी हे पहिले दूरचित्रवाणी केंद्र (१९४९) होय. १९५७ पासून शैक्षणिक दूरचित्रवाणीची सोय करण्यात आली आहे. ईस्टफ्लॉरिडागॅझेट हे येथील पहिले वृत्तपत्र (१७८३) होय. फ्लॉरिडाटाइम्सयुनियन हेसुद्धा येथील एक जुने दैनिक आहे (३१ डिसेंबर १८६४). स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन व इटालियन भाषांतूनही काही नियतकालिके निघतात. काही धार्मिक साप्ताहिके आहेत. निग्रो समाजाचीही स्वतंत्र वृत्तपत्रे आहेत.

 

लोकवसमाजजीवन : राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ८४% लोकसंख्या महानगरीय प्रदेशात राहते. १९७० मध्ये राज्यात ८५% गौरवर्णी व १५% कृष्णवर्णी होते. १९७७ मधील राज्यातील जन्ममृत्यूप्रमाण अनुक्रमे दर हजारी १२·८ व १०·५ होते.

 

शिक्षण : इ. स. १६०० मध्ये स्पॅनिशांनी येथे पहिली शाळा सुरू केली. १सातव्याशतकात ब्रिटिशांनी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. सध्या ७ ते १६ वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. १९७७ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये एकूण १५,३४,०४१ विद्यार्थी तर २८ महाविद्यालयांतून ५,४३,१६२ विद्यार्थी होते राज्यात सु. शंभरावर ग्रंथालये असून त्यापैकी सेंट ऑगस्टीन फ्री पब्लिक लायब्ररी (१८७४). टँलाहॅसीतील फ्लॉरिडा स्टेट लायब्ररी, फ्लॉरिडा विद्यापीठातील पी. के. यंग मेमोरियल लायब्ररी ऑफ फ्लॉरिडा हिस्टरी, सॅनफर्डमधील मेमोरियल लायब्ररी ही ग्रंथालये विशेष उल्लेखनीय आहेत. १९७३ मध्ये राज्यात २३४ रूग्णालये व ५०,६२९ खाटा होत्या. यांपैकी २१४ सामान्य, १८ विशेष व २ क्षयरोग रूग्णालये होती. १९७४ पासून वृद्ध, अंध व दुर्बल लोकांच्या मदतीची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे. १९६८ पासून राज्यांतील फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

 

पर्यटन: एक उत्तम पर्यटन केंद्र म्हणून फ्लॉरिडाची जगभर ख्याती आहे. पर्यटन हा केवळ हिवाळी व्यवसाय राहिला नसून तो वर्षभर चालतो. दरवर्षी सु. २ कोटींहून अधिक पर्यटक फ्लॉरिडाला भेट देतात. त्यामुळे पर्यटन हा येथील एक प्रमुख व महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. १९७७ मध्ये २·९ कोटींहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या व त्यांपासून राज्याला १,१२० कोटी डॉलरचे उत्पन्न मिळाले, राज्यशासनाच्या अखत्यारीत ७४ उद्याने व चार वने असून राष्ट्रीय स्वरूपाचे एक उद्यान आणि नऊ वने आहेत. यांपैकी ५,२०० चौ किमी. क्षेत्राचे एव्हरग्लेड्झ नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे. याशिवाय जॉन पेनेकॅप कोरल रीफ स्टेट पार्क व ॲपालॅचिकोला (२,५००चौ किमी.), ऑसीओला, ओकॅला ही राष्ट्रीय वने अभयारणे म्हणून प्रसिद्ध असून पर्यटकांच्या मनोरंजनाच्या विविध सोयी त्यांत आहेत. साउथ मिआमीमधील ५·२६ हे क्षेत्रफळाचे व रंगीबेरंगी पक्ष्यांचे ‘पॅरट जंगल’, गाउल्ड्सजवळील मंकी जंगल, सॅरासोटामधील जगप्रसिद्ध सॅरासोटा जंगल गार्डन्स, बॉनिटो स्प्रिंग्ज येथील एव्हरग्लेड्झ वंडर गार्डन्स, टँपा येथील बुश गार्डन, सेंट ऑगस्टीन ॲलिगेटर फार्म, वेल्सजवळील ७१ घंटांचा जगप्रसिद्ध सिंगिंग टॉवर, ऑर्‌लँडोजवळील केनेडी स्पेस सेंटर व इ. ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

 

सेंट ऑगस्टीन येथील कास्टील्लो दे सॅन मार्कोस १६७२-१७५६ या काळात बांधलेला देशातील सर्वांत जुना व चिरेबंदी किल्ला होय. त्याच्या जवळच फोर्ट माटांझास नॅशनल मान्यूमेंट (१७४२), जॅक्सनव्हिलजवळील दे सोटो नॅशनल मेमोरियल इ. राष्ट्रीय स्मारके उल्लेखनीय आहेत. या दृष्टीने सेंट ऑगस्टीन शहर प्रसिद्ध आहे. मिआमी बीच, वेस्ट पाम बीच, पाम बीच, फोर्ड लॉडरडेल, हॉलिवुड, डेटना बीच यांसारख्या अनेक सुंदर पुळणी फ्लॉरिडाला लाभल्या आहेत. शिकार, मासेमारी व विविध प्रकारचे खेळ या दृष्टींनी तर फ्लॉरिडा म्हणजे नंदनवनच होय.

 

फ्लॉरिडात नववर्षदिनी मिआमी, जॅक्सनव्हिल व ऑर्‌लँडो येथे होणारे फुटबॉल सामने आणि वसंत ॠतूत होणाऱ्या बेसबॉल स्पर्धा, तसेच घोड्यांच्या व शिकारी कुत्र्यांच्या शर्यती उल्लेखनीय आहेत.

 

राज्यातील सर्वात मोठे शहर म्हणून जॅक्सनव्हिलचा क्रमांक लागतो (लोकसंख्या ५,२८,८६४-१९७०). त्याखालोखाल मिआमी (३,३४,८५९), टँपा (२,७७,७६७), सेंट पीटर्झबर्ग (२,१६,२३२), फोर्ट लॉडरडेल (१,३९,५९०), हॉलिवुड (१,०६,८७३), हाइलीआ, ऑर्‌लँडो, मिआमी बीच, पेन्साकोला, वेस्ट पाम बीच, क्लिअरवॉटर, डेटन बीच, कोरल गेबल्स, लेकलँड, सॅरासोटा, मेलबर्न ही प्रमुख शहरे होत.

 

चौधरी, वसंत