बन्नू : पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील बन्नू जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व लष्करी केंद्र. लोकसंख्या ३३,००० (१९७२). हे पेशावरच्या नैऋत्येस १४५ किमी. कुर्रम नदीच्या दक्षिणेस वसले आहे. दळणवळण व व्यापार यांचे हे महत्वाचे केंद्र आहे.
लेफ्टनंट हर्बर्ट बेंजामिन एडवर्ड्झने १८४८ मध्ये लष्करी तळ म्हणून हे वसविले. अफगाण टोळ्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने यास महत्व प्राप्त झाल्याने अल्पावधीतच हे एक प्रमुख लष्करी केंद्र बनले व त्या दृष्टीने यास अद्यापही महत्व आहे. प्रथम पंजाबचा राजा दलीपसिंगच्या नावावरून ‘दलीपनगर’ (धुलीपनगर) म्हणून हे ओळखले जात होते, परंतु १८६९ मध्ये याला ‘एडवर्ड्झाबाद’ असे नाव पडले. १८६१ मध्ये झालेल्या बन्नू जिल्ह्यावरून १९०३ मध्ये शहरास हे नाव देण्यात आले. बन्नूजवळच असलेल्या ॲक्रा गावी इ. स. पू. दहाव्या ते पहिल्या शतकांतील संस्कृति व वास्तुशैली यांचे नमुने आढळतात. तसेच येथे इ.स.पू. दुसऱ्या शतकातील इंडो-ग्रीक सत्ताधीशांच्या प्रादेशिक राजधानीचे अवशेष आहेत.
येथे लोकर उद्योग प्रमुख असून लाकडी व कातडी वस्तूंचे उत्पादनही चांगले होते. येथील महाविद्यालय पेशावर विद्यापीठाशी संलग्न आहे.
ओक, द. ह.