संगमनेर : महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण, एक व्यापारी व ऐतिहासिक शहर. लोकसंख्या ६१,९५८ (२००१). पुणे-नासिक राष्ट्रीय महामार्गावरील हे शहर अहमदनगरच्या वायव्येस सु. ८१ किमी.वर तर नासिकच्या आग्नेयीस  ६५ किमी.वर महाळुंगी व प्रवरा नदयांच्या संगमावर वसले आहे.

शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्ल्म याचा इ. स. १००० मधील तामपट येथे सापडला आहे. निजामशाहीत (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते  इ. स. १६५९ मधील आहेत तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व छ. शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संगामात महाराजांचा सेनापती सिधोजी   निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल् प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लंच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लंचीही येथे स्मारके आहेत.

उत्तर पेशवाईत संगमनेर हे अकरा परगण्यांचे मुख्यालय होते. पेशवाईतील प्रसिद्घ साडेतीन शहाण्यांपैकी विठ्ठल सुंदर परशरामी, याशिवाय शाहीर अनंत फंदी (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते.

संगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. नासिक, शिर्डी, शनी  शिंगणापूर, भीमाशंकर, भंडारदरा धरण, प्रवरानगर-लोणी, कळसूबाई शिखर इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या व्दारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात पुणे विदयापीठाशी संलग्न असलेली महाविदयालये आहेत. गंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैदयक, दंतवैदयक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत.

देशपांडे, सु. र.